
यंदा सन 2019-20 च्या आर्थिक वर्षात करवीर निवासिनी श्रीअंबाबाई चरणी 191 तोळे सोने व 18 किलो चांदी तर वाडिरत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्रीजोतिबाच्या चरणी 28 तोळे सोने व 8 किलो चांदी असे दागिने भक्तांकडून दान करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा या दागिन्यांचे उशिरा मुल्यांकन झाले असून या सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे 83 लाख 76 हजार 99 रूपये झाली आहे. गतवर्षी च्या तुलनेत या आर्थिक वर्षात सुमारे 42 लाख 71 हजार रुपयांची घट झाल्याची माहिती प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरवर्षी भक्तांकडून श्रीअंबाबाई देवीच्या चरणी सोने-चांदीचे दागिने दान केले जातात. देवस्थान समितीकडून त्याचे मूल्यांकनही करण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे हे मूल्यांकन उशिरा झाले.
या वर्षी करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या आकडेवारीनुसार, गतवर्षी सन 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी 26 लाख 47 हजार 505 रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे अंबाबाई आणि जोतिबा चरणी दान झाले होते. आता सन 2019-20 या आर्थिक वर्षात 83 लाख 76 हजार 99 रूपयांचे दागिने दान झाले आहे.
गतवर्षी अंबाबाई चरणी भाविकांनी 335 तोळ्यांहून अधिक सोने आणि 16 किलो चांदीचे दागिने दान केले होते. 2019-20 या आर्थिक वर्षात अंबाबाई चरणी 191 तोळे सोने आणि 18 किलो चांदीचे भक्तांनी दान केले आहे. तसेच गतवर्षी जोतिबा चरणी 17 तोळे सोने आणि दीड किलो चांदीचे दागिने भाविकांनी दान केले होते. तर यंदा 28 तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने व सुमारे 8 किलो चांदीचे दागिने दान केले आहेत.
































































