
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने मंगळवारी मध्यरात्री फुटबॉलच्या रणांगणात ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने बार्सिलोनासाठी खेळताना 644 वा गोल करीत ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांनी सांतोस क्लबसाठी खेळताना केलेल्या सर्वाधिक 643 गोलच्या विक्रमाला मागे टाकले. बार्सिलोनाने वेलाडोलीड या संघाला ला लीगा या फुटबॉल स्पर्धेतील लढतीत 3-0 अशा फरकाने हरवले. लियोनेल मेस्सीने 65 व्या मिनिटाला विक्रमी गोल केला हे विशेष.
आंतरराष्ट्रीय विक्रमही मोडण्याच्या तयारीत
लियोनेल मेस्सी याने अर्जेंटिनासाठी खेळताना 142 सामन्यांमधून 71 गोल केले आहेत. पेले यांनी ब्राझीलसाठी खेळताना 92 सामन्यांमधून 77 गोल केले आहेत. लियोनेल मेस्सी याने क्लब स्तरावर पेले यांचा विक्रम नुकताच मोडीत काढला आहे. मात्र पेले यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलनाही तो मागे टाकू शकतो. लियोनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी खेळताना आणर्खी सात गोल केल्यास पेले यांच्या 77 आंतरराष्ट्रीय गोलनाही तो मागे टाकेल.
विक्रमाचा विचारही केला नव्हता
पेले यांचा विक्रम मोडल्यानंतर लियोनेल मेस्सी म्हणाला, ‘20 वर्षांपूर्वी फुटबॉल खेळायला सुरुवात केले तेव्हा कोणताही विक्रम मोडू शकेन असे वाटले नव्हते. पेले यांच्या विक्रमाबाबत तर विचारही केला नव्हता’. यानंतर मेस्सी भावुक होऊन म्हणाला, ‘माझे कुटुंब, सहकारी, मित्र या सर्वांच्याच समर्थनामुळे मला इथपर्यंत मजल मारता आलीय.




























































