बेकरी व्यवसायात ‘मराठी ब्रॅण्ड’चा डंका, हॉलंडच्या दर्जेदार पदार्थांना खवय्यांची पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वांच्या पसंतीस उतरणारी बेकरी उत्पादने तयार करण्यात मराठी व्यावसायिकही आता चांगलेच स्थिरावले असून बाजारात स्वतःच्या ब्रँडची ओळख निर्माण करीत आहेत. अंधेरी येथील अभिषेक दळवी यांनी जगप्रसिद्ध ‘हॉलंड’ बँडशी भागिदारी करून यशस्वी होत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दळवी यांच्या ‘हॉलंड बेकरी अँड स्नॅक्स’मध्ये तयार होणारी उत्पादने खवय्यांची पहिली पसंती ठरत आहेत.

बेकरी व्यवसाय हा पहिल्यापासून परप्रातींयाच्या हातात असल्याने आणि प्रचंड स्पर्धेमुळे या क्षेत्रात मराठी व्यावसायिक यशस्वी होत नव्हता. मात्र उच्चशिक्षित असणाऱया अभिषेक दळवी यांनी नोकरीच्या मागे न लागता  स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. एका बेकरी ब्रँडकडून फ्रेंचाईजी घेऊन त्यांनी यशस्वी होऊन दाखवले. आता जून 2020 मध्ये गोरेगाव, अंधेरी आणि बोरिवली येथे ‘हॉलंड बेकरी अँड स्नॅक्स’ असा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. याला ग्राहकांच्या उदंड प्रसिसाद मिळत आहे. नव्या वर्षात फ्रेंचाईजी देण्यास सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कामात त्यांना पत्नी निराली दळवी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

बडय़ा ब्रॅण्डकडून जाणीवपूर्वक त्रास

मराठी माणसाने मुंबईत सुरू केलेला ‘हॉलंड ब्रँड’ मुंबईत चांगलाच गाजत असताना काही बडय़ा ब्रँडकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचे अभिषेक दळवी यांनी सांगितले. आधी मराठी माणसाला फ्रेंचाइजी देऊन नाव कमवायचे आणि नंतर त्यांचाच काटा काढायचा असे प्रकार सुरू आहेत. अशा मुजोर परप्रांतीय व्यावसायिकांविरोधात पोलिसात तक्रार केल्याचेही दळवी यांनी सांगितले.

कामासाठी मराठी मुलांनाच प्राधान्य

दळवी यांनी सुरू केलेल्या हॉलंड ब्रँडच्या बेकरी उत्पादनामध्ये कामासाठी मराठी मुलांनाच प्राधान्य देण्यात येते. त्यांच्या सध्याच्या बोरिवली, अंधेरी आणि गोरेगावच्या बेकरीमध्ये एपूण 60 मुले काम करीत आहेत. त्यामुळे  हॉलंड बेकरीच्या निमित्ताने मराठी मुलांना नोकरीची संधीही उपलब्ध झाली आहे.

ख्रिसमस-नववर्ष ठरणार पर्वणी

हॉलंड ब्रँडमध्ये विविध प्रकारचे केक, कुकीज, मल्टीग्रीन खारी, कप केक, चॉकलेट, ड्रायप्रुट, तरुणांची पसंती असणारे विविध प्रकारचे रोल्स, बेड्स, दर्जेदार चहा-कॉफी वाजवी दरात उपलब्ध असते. येत्या ख्रिसमससाठी  हॉलंड बेकरीत दिडशे वर्षांच्या रेसिपीवर ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवला जाणार आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्षासाठी खवय्यांना पर्वणी ठरणार आहे.