
दहशतवाद्यांना मदत केल्या प्रकरणी तसेच लष्कराची गुप्त माहिती पुरविल्या प्रकरणी तुर्कीतील कुम्हुरियेत या वर्तमानपत्राचा माजी संपादक कॅन डुंडर याला 27 वर्षाच्या तरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्तानबुलमधील न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आहे.
कॅन डुंडर याने 2015 ला त्याच्या वृत्तपत्रात एक बातमी छापली होती. त्या बातमीत त्याने तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणांवर गंभीर आरोप केला होता. तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणा सिरीयाला शस्त्रसाठा करत असल्याचा आरोप त्या वृत्तपत्रातून करण्यात आला होता. त्यासोबत त्याने एक व्हिडीओ व काही फोटो देखील पब्लिश केले होते. त्या व्हिडीओत तुर्कीच्या लष्कराचा गणवेश घातलेले काही जण मोठे मोठे बॉक्स एका ट्रकमध्ये भरत असल्याचे त्यात दिसत होते. त्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोत त्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं भरलेली होती असे दिसले.
या बातमीनंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष ताय्यीप एर्डोगन यांनी डुंडरला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे सांगितले होते. त्यानंतर डुंडरवर दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर डुंडर तुर्की सोडून जर्मनीला पळून गेला. त्यामुळे अनेकदा समन्स बजावूनही तो परत न आल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले होते.





























































