ठरलं तर..! आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश होणार, बीसीसीआयची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये बीसीसीआयने मोठे बदल केले आहेत. आयपीएल स्पर्धेसाठी बीसीसीआयने दोन नव्या संघांना परवानगी दिली आहे. त्यामुळे 2022 पासून विजेतेपदासाठी 10 संघ झुंजताना दिसतील.

बीसीसीआयची गुरुवारी 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत 2022 आणि त्यानंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एनआयए’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दोन नवीन संघांचा समावेश केल्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2021 मध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत 10 संघ ठेवणे सध्या शक्य नाही. टेंडर आणि अन्य गोष्टींसाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असून सध्या तसे करणे शक्य नाही. मात्र 2022 मध्ये 10 संघ सहभागी होतील आणि 94 लढती खेळल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

करमुक्तीसाठी सरकारशी चर्चा

दरम्यान, पुढील वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक आणि 2023 मध्ये एक दिवसीय विश्वचषक हिंदुस्थानमध्ये होणार आहे. हिंदुस्थानमध्ये होणाऱ्या या दोन्ही स्पर्धा करमुक्त करण्यासाठी बीसीसीआयचे सविच व कोषाध्यक्ष सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती बीसीसीआय अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, अदानी ग्रुप आणि संजीव गोएंकाचे आरपीजी (राइझिंग पुणे सुपरजाइंट्सचे मालक) अहमदाबादच्या एका फ्रँचायझीसह नवीन संघांच्या मालकीसाठी इच्छुक आहेत. तसेच अन्य काही बडे उद्योजक देखील नवीन संघांसाठी उत्सुक असून बीसीसीआय कोणाला टेंडर देते हे पाहणे औत्सुक्याचे असेल.