
नाइट कर्फ्यू लावल्यावर अनेकांनी प्रश्न विचारले की, हा कोरोना काय रात्रीचा मोकाट सुटतो व दिवसा घरात बसतो काय? पण तसे नाही. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. अजूनही आपल्याला बंधनाची आवश्यकता आहे. दिवसा लॉकडाऊन आपण करू शकत नाही, तशी वेळदेखील येऊ नये. पण निदान रात्रीची संचारबंदी म्हटल्यावर धोक्याची जाणीव नागरिकांना असते. अनावश्यक गर्दी टाळून मास्कचा वापर, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे जर आपण पाळलं तर आपण या संकटावर मात करू शकतो, असा सावधगिरीचा सल्ला देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीच्या संचारबंदीला विरोध करणाऱयांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी रात्रीच्या संचारबंदीवरून केल्या जाणाऱ्य़ा टीकेचा समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पाश्चिमात्य देशात जी दुसरी लाट आहे. तो व्हायरस रोखण्यासाठी लंडनमधून येणारी विमानं थांबविली. तिथे येणारा व्हायरस आपण रोखू शकू. पण तिथे व्हायरसचे म्युटेशन झालेले आहे, आफ्रिकेत व्हायरसने आपले रूप बदलले आहे. आपल्या इथे जर असं म्युटेशन झालं तर काय? ते टाळायचं असेल तर व्हॅक्सिन येवो न येवो, हात धुणे, मास्क लावणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीवरच भर द्यावा लागणार आहे.
कोरोनाचा धोका दिसत असताना पत्रकारितेची जबाबदारी पार पाडलीत. जगाच्या इतिहासात आतंकवादी हल्ला करताना तो पॅमेऱ्य़ात टिपण्याचं मोठं धाडस आपल्या पत्रकारांनी केलं. कसाब समोर दिसत होता. मात्र हा कोरोना डोळ्यांनी दिसू शकत नसताना आपण आपली जबाबदारी पार पाडलीत. त्याबद्दल तुमचं कौतुक करतो, तुमचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार आणि कॅमेरामनचे कौतुक केले.
मी खचलो असतो तर…
आयुष्याचं युद्ध आपण रोज लढत असतो. ते सुरू असताना अचानक त्याला ब्रेक लागणं, हे सुद्धा लोकांच्या मनावर अतिशय विचित्र पद्धतीने आघात करत होतं. या सगळ्यातून सावरण्याचं दडपण माझ्यावर देखील होतं. पण जर मी खचलो असतो तर काय? हा एक मुद्दा होता. लढणं आहेच, लढण्याशिवाय पर्याय नव्हता, हार मानणं तर शक्य नव्हते, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारीसह कोरोना काळात राज्य सरकारने उभारलेल्या लढय़ाची माहिती दिली.





























































