मुंबईत कोरोना लसीकरणासाठी आठ केंद्रे, लसीकरणासाठी पालिकेची जोरदार तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असून कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या वाढली आहे. मृत्यूदरातही कमालीची घट आली आहे. त्याचबरोबर कोरोनावरील तीन लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका 8 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे उभारणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या कृती दलाची म्हणजेच टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडल्यानंतर लसीकरणाची तयारी जलद गतीने सुरु झाली. त्या पार्श्वभूमीवर, लसीकरणासाठी कांजूरमार्ग येथे पालिका इमारतीमध्ये 5 हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस स्टोअर (आरव्हीएस) म्हणून उभारण्याची तयारी सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोरोना लस वितरणासाठी वापरण्यात येईल तसेच मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्तबरोबरच अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

ही आहेत आठ केंद्रे

परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वेपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे 8 लसीकरण केंद्रे तयार करण्यात येणार आहेत.

14 आणि 15 डिसेंबर, 2020 रोजी प्रशिक्षकांचे दोनदिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. सहाय्यक आरोग्य अधिकारी (विशेष लसीकरण कार्यक्रम) विभागातील चार वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डब्ल्यूएचओ- एसएमओ, यूएनडीपी-कार्यक्रम अधिकारी हे मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित आहेत. सोबत, वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, वरिष्ठ अधिकारी (दवाखाने) आणि सहाय्यक वैदयकीय अधिकारी (विलका) या सर्व प्रशिक्षकांचे आवश्यक प्रशिक्षण घेतले जात आहे. हे सर्व प्रशिक्षक आपापल्या केंद्रांवर आणि क्षेत्र पातळीवरील कर्मचाऱयांना यांना प्रशिक्षण देतील. हे सर्व प्रशिक्षण 7 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल.