मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये पालिका निवडणुकांची तयारी, स्वबळावर लढण्याचा भाई जगताप यांचा पुनरुच्चार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार असले तरी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसला मुंबईतील 227 वॉर्ड मध्ये काँग्रेसचे काम करायचेय. निवडणुकीची तयारी सुद्धा आम्हाला सर्व वॉर्डांत करायची आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून त्यांना प्रोत्साहन द्यायचेय, असे सांगत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा पुनरुच्चार केला.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर भाई जगताप यांनी मुंबईतील थोर पुरुषांच्या स्मृतिस्थळांना वंदन करून कामाला सुरुवात केली. यावेळी भाई जगताप यांनी मुंबईतील मंत्रालयाजवळील  येथील महात्मा गांधी तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले.

महापुरुषांच्या स्मृतिस्थळावर जेव्हा आपण नतमस्तक होतो व त्यांना अभिवादन करतो, तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते. नवी ऊर्जा मिळते. मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून कामाची नव्या जोमाने सुरुवात करताना हीच प्रेरणा व ऊर्जा आपल्या कामी येईल. मुंबईतील काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत हीच प्रेरणा व ऊर्जा मला पोहचवायची आहे, असे भाई जगताप म्हणाले.   यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर व भूषण पाटील आदी उपस्थित होते.