
आशियातील सर्वात मोठय़ा धारावी झोपडपट्टीत 25 डिसेंबरला एकही रुग्ण सापडला नसताना आज जी-उत्तर विभागातील दादरमध्येही एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. 30 एप्रिलनंतर पहिल्यांदाच दादरमध्ये रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसह दादरमध्येही झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत गेल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले. मात्र पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण प्रभागासाठी दर्जेदार सुविधांचे कोविड सेंटर, ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, जनजागृती, औषधोपचार, निर्जंतुकीकरण आणि पॉझिटिव्ह रुग्ण-क्लोज काँटॅक्टबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याने रुग्णसंख्या झपाटय़ाने घटत आहे. दादरमध्ये 30 एप्रिलनंतर पहिल्यांदाच आज एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, धारावीमध्ये आज केवळ एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली असून माहीममध्ये 7 नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत.
26 डिसेंबरची ‘जी उत्तर’ची स्थिती
ठिकाण ऑक्टिव्ह डिस्चार्ज
- दादर 102 4475
- माहीम 209 4215
- धारावी 13 3464
- एकूण 324 12154
‘जी उत्तर’ कोरोनामुक्तीकडे
धारावीची दाटीवाटीची झोपडपट्टी असलेल्या धारावीसह गर्दीचे दादर आणि माहीम परिसर असलेल्या ‘जी-उत्तर’ विभागात कोरोना रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात येत आहे. या विभागात आतापर्यंत आढळलेल्या एकूण 13107 रुग्णांपैकी 12 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रभागात केवळ 324 ऑक्टिव्ह रुग्ण राहिले असून यातील 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याने जी-उत्तर प्रभागाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली आहे.



























































