
लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. आपल्या जोडीदाराला काय गिफ्ट द्यायचे याचे प्लॅनिंग सगळेजण आधीपासूनच करतात. राजस्थानमधल्या एका व्यक्तीने लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त पत्नीला चक्क चंद्रावरील तीन एकर जमीन भेट म्हणून दिली आहे. धर्मेंद्र अनीजा असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी पत्नी सपनाला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची सर्वत्र चर्चा आहे. धर्मेंद्र म्हणाला, 4 डिसेंबरला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मला पत्नीला काहीतरी वेगळे गिफ्ट द्यायचे होते. म्हणूनच गाडी, भेटवस्तू किंवा दागदागिने खरेदी न करता मी तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ही जागा धर्मेंद्र यांनी लुन सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून खरेदी केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्यांना एक वर्षाचा कालावधी लागला आहे. चंद्रावर जमीन विकत घेणारा मी राजस्थानातील पहिली व्यक्ती असल्याचे ते सांगतात. आपल्या पतीने आपल्याला आऊट ऑफ द वर्ल्ड गिफ्ट दिल्याचा आनंद सपनाने व्यक्त केला आहे.






















































