बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

यशस्विनी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी बाळ बोठे याच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. आज एका महिलेने बोठे याच्या विरोधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी बोठेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

रेखा जरे हत्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी पाच आरोपींना अटक केली होती. या घटनेतील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा 20 दिवस उलटूनही तपास लागलेला नाही. वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. बोठेच्या शोधासाठी दोन ठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत.

पोलिसांनी रेखा जरे यांचा मोबाईल हस्तगत केला असून, त्यातून अनेक गोष्टी पुढे आल्या होत्या. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अनेकांचे जबाब घेण्यास सुरुवात केली होती. जरे कुटुंबाला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. गेल्या चार दिवसांपासून तपासी अधिकाऱयांपुढे अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले होते. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. काल रात्रीही दोन महिलांचे जबाब घेण्यात आले होते.

फरार आरोपी पत्रकार बोठे याचा ठावठिकाणा लागत नाही. दुसरीकडे त्याचा जवळचा मित्र डॉ. नीलेश शेळकेला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, त्याला आर्थिक गुह्यात पोलिसांनी अटक करून तपास सुरू केला आहे. त्याच्या तपासातून बोठेचा ठावठिकाणा लागतो का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आज बोठेविरोधामध्ये एका महिलेने विनयभंग केल्याची लेखी तक्रार दिली. सप्टेंबर 2019 ते 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत संबंधित महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिच्याशी अश्लील हावभाव करत छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याचे त्या महिलेने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बोठेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज महाजन
करीत आहेत.

काय आहे फिर्यादीत

सप्टेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 या काळात वेळोवेळी विनयभंग केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी महिलेच्या कुटुंबाशी ओळख असल्याने बोठे याचे आमच्या घरी येणे-जाणे होते. घरी आल्यावर कुटुंबीयांशी बोलत असताना आपल्याकडे पाहून अश्लील कॉमेंटस करणे, हावभाव करणे, स्पर्श करणे तसेच मोबाईलवर संपर्क साधून पाठलाग करणे, अशी कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी बोठे विरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.