गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या ऑबेरॉय जंक्शनसाठी ‘आयआयटी’चे तंत्रज्ञान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील ऑबेरॉय मॉल जंक्शनसाठी आयआयटीचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामध्ये ट्रफिक सिम्युलेशनच्या अभ्यासासाठी विशेष सॉफ्टवेअर आणि तंज्ञांच्या माध्यमातून आराखडा तयार करून काम केले जाणार आहे.

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱया गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. ‘जीएमएलआर’ने पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व उपनगरातील मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडण्यात येतील. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी 12.2 कि.मी. असून यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली 4.7 कि.मी. लांबीचे दोन भूमिगत बोगदे तयार करण्यात येणार आहेत. शिवाय या लिंक रोडच्या कामात गोरेगाव फिल्मसिटीतील प्रस्तावित कट आणि कव्हर भुयारी मार्गाची लांबीही 1.02 कि.मी. आहे. ‘जीएमएलआर’ प्रकल्पात गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती मार्गाखाली वाहतुकीसाठी 19 मीटर रुंद चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. या ठिकाणी गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची प्रस्तावित रुंदी 27.45 मीटर होणार आहे. सद्यस्थितीत ही रुंदी 24 मीटर आहे. या कामासाठी रस्ता रेषा निर्धारित करण्यासाठी वाहतूक मोजणे आणि ट्राफिक सिम्युलेशन (वाहतूक चलप्रतिरूम) अभ्यास करणे आवश्यक आहे. हा अभ्यास आयआयटीकडून करून घेतला जाणार आहे. या अभ्यासासाठी मुंबई आयआयटीची नियुक्ती करण्यात आली असून या अभ्यासासाठी पालिका 15 लाख रुपये खर्च करणार आहे.

विश्वासार्ह असल्यानेच आयआयटीला काम

  • गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण 12.2 कि.मी. आहे. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 4.7 कि.मी.चा भुयारी रस्ता काढण्यात येणार आहे, तर फिल्मसिटीतून 1.02 कि.मी.चा भुयारी रस्ता काढण्यात येणार आहे.
  • आयआयटी मुंबई ही देशातील अग्रगण्य संस्था असल्यामुळे निविदा न मागवता काम करण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. आयआयटीचा अहवाल परिणामकारक आणि विश्वासार्ह असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.