शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा, परिसर सोडियम हायपो क्लोराईडने सॅनिटाइज करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना शाळांनी तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमीटर घ्यावेत. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांनी शाळा, परिसर सोडियम हायपोक्लोराईडने सॅनिटाइज करावा, असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी निर्देश दिले.

ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक उपसभापती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती ना. डॉ नीलम गोऱहे म्हणाल्या, पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा द्यावी. राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर 17 चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळाबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना देखील डॉ. गोऱहे यांनी शिक्षण विभागास केली. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपो क्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्रण फवारावे अशा सूचना त्यांनी ग्रामविकास विभागाला दिल्या.

मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे गुन्हा

न्यता नसलेल्या शाळा सुरू असल्याबाबत पिंपरी-चिंचवड येथील पालकांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर डॉ. गोऱहे यांनी पुढे सांगितले की, मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा असून याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा व शिक्षण विभागाला कळवावे. शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश दिले. यावेळी आरोग्य विभाग प्रधान सचिव प्रदीप व्यास, शालेय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शाळांचा सॅनिटायझेशनचा खर्च वाढला, सरकारने अनुदान द्यावे – भाऊ कोरगावकर

संस्थांसंचालक संघटनेच्या वतीने भाऊ कोरगावकर यांनी शाळा दोन सत्रात असल्याने सॅनिटायझेशन पुन्हा पुन्हा करावे लागते. त्यामुळे शाळांचा खर्च वाढला आहे. म्हणून शासनाने विशेष आपत्ती अनुदान द्यावे तसेच ऑनलाईन शाळांसाठी वंचित मुलांना प्राधान्य द्यावे असे मुद्दे मांडले. यावर बोलताना उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या औषधासाठी जिल्हा परिषद शाळांनी सेस फंड वापरावा असे निर्देश दिले. तर ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी संदेश भांडारकर यांनी हे औषध स्वस्त असून ग्रामपंचायत व जिल्हा परिषद त्यांच्या सेस फंडातून खरेदी करू शकते असे सांगितले.