
सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने जानेवारी ते 28 डिसेंबर 2020 अखेर 49 हजार 400 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 881 वाहनचालकांचे लायसेन्स 3 महिन्यांकरिता निलंबित करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या जस्टिस के. एस. राधाकृष्णन समितीच्या सूचनांनुसार प्राणांतिक व गंभीर अपघातास कारणीभूत असणाऱया कलमांखाली वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. बेशिस्त वाहनचालक व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱया वाहनचालकांमुळे प्राणघातक व गंभीर अपघात तसेच वाहतूककोंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने विविध कलमांनुसार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
सोलापूर शहरात सध्या स्मार्ट सिटीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे करताना कोणते रस्ते चालू, कोणते रस्ते बंद याबाबतची माहिती व नियोजन स्मार्ट सिटी समन्वयातून वाहतूक शाखेकडून करण्यात येत नाही. त्यामुळे शहरातील अनेक वर्दळीच्या बाजारपेठेच्या रस्त्यांवर काहीजण कशाही पद्धतीने वाहने चालवितात. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज आहे.
अल्पवयीन मुलांच्या 31 पालकांवर खटले दाखल
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी दिल्याने पालक, वाहनमालक अशा 31 जणांविरुद्ध न्यायालयात खटले पाठवून त्यांना 31 हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. रिक्षा व वाहनांमध्ये मोठय़ा आवाजाने टेप वाजविणाऱया 80 वाहनांवर ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात आल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी माहिती दिली.





























































