हिंदुस्थानसाठी सियाचीन ग्लेशियर अभेद्य करणाऱ्या योद्धय़ाने घेतला जगाचा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया हिमालयातील अतिथंड सियाचीन युद्धभूमीवर प्रथम पाय ठेवत तिचा सखोल अभ्यास करणारे आणि नकाशे, व्हिडीओ तयार करून लष्करीदृष्टय़ा सियाचीनला अभेद्य करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे योद्धे कर्नल नरेंद्र बुल कुमार हे कालवश झाले आहेत.

दिल्लीतील आर्मी रिसर्च अॅण्ड रेफरल (आर अॅण्ड आर) रुग्णालयात कर्नल कुमार यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी 87 वर्षांचे असणारे ‘पद्मश्री’ नरेंद्र बुल कुमार वयोमानानुसार अनेक आजारांनी ग्रासले होते.

कर्नल नरेंद्र बुल कुमार हे सियाचीन ग्लेशियरवर पहिल्यांदा पाऊल ठेवणारे पहिले लष्करी अधिकारी होते. गिर्यारोहण मोहिमेदरम्यान त्यांनी ही सर्वोच्च कामगिरी पार पाडली होती. या मोहिमेदरम्यान त्यांना अनेक गोष्टी समजून घेतल्या.

या मोहिमेवरून परतल्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी सैन्य आणि राजकीय नेतृत्वाला सियाचीन ग्लेशियरचे लष्करी महत्त्व पटवून दिले होते. गिर्यारोहक म्हणून अनेकदा सियाचीन ग्लेशियरवर गेल्याने त्यांनी इथली अनेक निरीक्षणे नोंदवून ठेवली होती.

ही निरीक्षणे सन 1983 मध्ये ‘इलिस्ट्रेटेड विकली’ या साप्ताहिकात छापून आली होती. हिमालयातील या सर्वांत उंचावरील पूर्णपणे गोठलेल्या परिसराच्या स्थितीचा आढावा घेणारा हा पहिलाच सार्वजनिक लेख होता.

ऑपरेशन मेघदूतच्या यशात सिंहाचा वाटा

कर्नल कुमार यांनी सियाचीन गिर्यारोहणादरम्यान तयार केलेले नकाशे आणि व्हिडीओ याच्या मदतीने हिंदुस्थानी लष्कराने 1984 मध्ये ‘ऑपरेशन मेघदूत’ लाँच केले होते. या मोहिमेंतर्गत हिंदुस्थानी लष्कराने सियाचीन ग्लेशियर सुरक्षित आणि अभेद्य केले होते.

पाकिस्तानकडून होणाऱया आक्रमकतेपासून सीमा सुरक्षित करणाऱया या ऑपरेशनच्या यशामागे कर्नल कुमार यांची प्रेरणा होती. केंद्र सरकारने त्याच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना 1965 मध्ये ‘पद्मश्री’ आणि त्यानंतर ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ने सन्मानित केले.

यंदाच्या सप्टेंबरमध्ये त्यांचा मुलगा मर्क्युरी हिमालयन एक्सपेडिशनचा सीईओ अक्षयकुमार (58) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. कर्नल कुमार नियतीने दिलेला हा झटका फार काळ सहन करू शकले नाहीत.