केरळमध्ये भाजपचा नव्या कृषी कायद्याला विरोध, विधानसभेत कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ विधानसभेत केंद्राने आणलेले तीनही नवीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला केरळमधील भाजपचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल यांनी पाठिंबा देत कृषी कायद्याला विरोध केला. विशेष म्हणजे प्रस्तावाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर केरळ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते.

यामध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी तीनही नवीन कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला. सत्तारूढ एलडीएफ, विरोधी आघाडी यूडीएफ आणि भाजपने या प्रस्तावास पाठींबा देत एकमताने मंजुरी दिली.

ही लोकशाहीची भावना -राजगोपाल

प्रस्ताव सर्वांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला आहे. मी माझे मत याबाबतीत मांडले आहे. जिथे माझे विचार वेगळे होते ते मी सदनात सांगितले आहेत. मी प्रस्तावाला पाठिंबा दिला असून केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत. ही लोकशाहीची भावना असल्याचे भाजप आमदार राजगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शेतकऱयांच्या मागे उभे राहणे सरकारचे कर्तव्य – मुख्यमंत्री विजयन

देश एका कठीण परिस्थितीतून जात आहे. अशातच आंदोलक शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. देशभरातून कृषी कायद्याला विरोध होताना पाहायला मिळत आहे. याचा केरळ राज्यावरही प्रभाव दिसू शकेल. राज्यात खाद्यपदार्थांची कमतरता भासू लागल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकेल, असे मत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी व्यक्त केले.