हे नर्मदे माते! आला तेवढा पूर पुरे झाला!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

स्वामी महाराजांचा चातुर्मास्य गरुडेश्वरला सुरू झाल्याचे कळल्याने सर्व लोक चांदोदहुन गरुडेश्वरला आले. गर्दी वाढू लागली. पाऊसही खूप पडत होता. नर्मदेला महापूर आला होता. सर्वजण घाबरले. कारण त्यामुळे श्रीस्वामी महाराजांच्या पर्णकुटीलाही धोका होता. तेव्हा सर्वांनी श्रीस्वामी महाराजांचीच प्रार्थना केली की, “महाराज! आपण तरी ह्या संकटावर आपणच नर्मदामातेची समजूत घातलीत, तर हे संकट टळेल.” ती प्रार्थना ऐकून, श्रीस्वामी महाराज दंड घेऊन नर्मदेवर आले प्रार्थनापूर्वक म्हणाले, “हे माते! आला तेवढा पूर पुरे झाला. आता अधिक वर आलीस तर सर्व भक्तांना त्रास होईल. तरी तू मागे फिरावेस प्रार्थना आहे!” असे म्हणून, श्रीस्वामी महाराजांनी आपला दंड नर्मदा जलाला लावला. तो स्पर्श होताच, नर्मदेचे पाणी ओसरू लागले.

धोंडेपंत कोपरकर गरुडेश्वर श्रीस्वामी महाराजांच्या दर्शनाला येण्यास निघाले. त्याच वेळी नर्मदेला मोठा पूर आला होता. नावेचा प्रवास होता. नावेत जवळजवळ पन्नास माणसे बसली होती. पाण्याचा जोर व नावेतील गर्दी यांमुळे प्रवाहाविरुद्ध नाव वर चढेना. उलट ती खाली खाली जाऊ लागली. त्यातच जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. नावेतील सर्व मंडळी भिजून कुडकुडू लागली. नाव किनाऱ्याला लागेना. उलट बुडण्याचीच भीती निर्माण झाली. श्रीस्वामी महाराजांचा धावा करणे हाच एक उपाय होता.

धोंडोपंत श्रीस्वामी महाराजांना प्रार्थना करण्यास सुरुवात केली, “महाराज! नावेतील सर्व मंडळी आपल्या चरणदर्शनार्थ येत आहेत. तरी सर्वांना आपल्या चरणांशी सुखरूप घेऊन चला. आमच्या अपराधांची क्षमा करून आमच्यावर कृपा करा!” अशी प्रार्थना करून, श्रीस्वामी महाराजांच्या नावाचा सर्वांनी जयजयकार केला. सर्वांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा’ हे भजन सुरू केले. काही वेळानंतर आपोआप नाव सरळ जाऊ लागली व लवकरच गरुडेश्वरी येऊन पोहोचली. गरुडेश्वरला पोहोचल्यावर श्रीस्वामी महाराजांना धोंडेपंत यांनी नमस्कार घातला व सर्व हकीकत निवेदन केली. गरुडेश्वरला, श्रीस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी काही चर्मगपीडित मुसलमान लोक आले होते. श्रीस्वामी महाराजांनी त्यांना औषध देऊन कुराणातील काही मंत्राचा जप करण्यास सांगितले.

([email protected])