‘रॉकेट स्टोव्ह’ करणार धुरापासून सुटका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे निश्चितच मानवी जीवन सुकर झाले आहे. आता केरळमधीलच उदाहरण घ्या ना…येथील अब्दुल करीम नावाच्या एका व्यक्तीने चक्क रॉकेट स्टोव्हची निर्मिती केली आहे. ज्यामुळे अन्न शिजवण्यासाठी ना गॅसची आवश्यकता आहे, ना विजेची. केवळ नारळाच्या कवटय़ा, सरपण, रद्दी पेपर आदींच्या सहाय्याने अन्न शिजवता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या रॉकेट स्टोव्हमुळे तब्बल 80 टक्के धूरही कमी होणार आहे.

अब्दुल करीम हे केरळच्या थ्रीककारा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या अनोख्या स्टोव्हमध्ये पाणी गरम करण्याची आणि ओव्हनची देखील सुविधा आहे. अब्दुल यांना भट्टी, बॉयलर आणि औद्योगिक साहित्य बनवण्याचा चार दशकांचा अनुभव आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या मोकळ्या वेळेत आपण रॉकेट स्टोव्हचे डिझाईन तयार केल्याचे अब्दुल सांगतात.

z या स्टोव्हमध्ये धूर बाहेर फेकण्यासाठी पाईपची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शहरी भागातील फ्लॅटसाठीदेखील हा स्टोव्ह उपयुक्त आहे. 4500 हजारांपासून 13 हजारांपर्यंत याची किंमत आहे. ग्रीलिंग, ओव्हन आणि पाणी तापवण्याची देखील सुविधा यात मिळेल. स्टोव्हच्या एका मॉडेलमध्ये ओव्हनची देखील सुविधा मिळणार आहे जे 280 डिग्री सेल्सियसपर्यंत उष्णता प्रदान करेल.