
सीएनजी पंपचालकांवर जाचक अटी लादतानाच त्यांची जमीन हडप करण्याच्या महानगर गॅसच्या पॉलिसीविरोधात 4 जानेवारीपासून पुकारलेला बंद पंपचालकांनी तूर्त 26 जानेवारीपर्यंत स्थगित ठेवला आहे. ‘गेल’च्या व्यवस्थापनाने यावर सकारात्मक तोडगा काढण्याची कबुली दिल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती सीएनजी डीलर्स असोसिएशनने दिली आहे.
सीएनजी पंपचालकांची कोणतीही छोटीसी चूक झाली तरी त्यांच्याकडून तडकाफडकी पंप काढून तो दुसऱया डीलरला देण्याची नवी पॉलिसी महानगर गॅसने आणली होती. यासह इतर निर्णयाविरोधात पंपचालकांनी संपाची हाक दिली होती. सीएनजी पंपचालकांच्या घोषणेनंतर गॅस ऑथोरिटी ऑफ इंडियाचे (गेल) अध्यक्ष मनोज जैन यांनी सीएनजी पंचचालकांसोबत तातडीची बैठक घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्याची माहिती युनायटेड सीएनजी गॅस डीलर्स असोसिएशनचे सदस्य संजय कदम यांनी दिली. मात्र यावेळी सीएनजी पंपचालकांनी महानगर गॅसच्या जाचक अटी नामंजूर असल्याचे सांगत दहा मुद्द्यांवर असोसिएशन ठाम असल्याचे सांगितले. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन जैन यांनी दिले. त्यामुळे सीएनजी पंपचालकांचा बंद 26 जानेवारीपर्यंत स्थगित केल्याचे संजय कदम यांनी स्पष्ट केले.






















































