
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूदरात घट आली असून आज तिघा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 हजारांच्या खाली आली आहे. दिवसभरात 570 जण कोरोनामुक्त झाले तर दिवसभरात 516 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी 357 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 138वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 76 हजार 34 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 357 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 943वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 24 लाख 4 हजार 1 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 94 हजार 985वर पोहोचली आहे.
आता माहीमही झिरो पॉझिटिव्ह
मुंबईत कोरोना रुग्णांची दररोजची संख्या 800च्या खाली आली असून पहिल्यांदा धारावी, त्यानंतर दादर आणि आज माहीममध्ये एकही रुग्ण सापडला नाही. जी/उत्तरमध्ये धारावी तसेच दादर-माहीमसारखे दाटीवाटीचे भाग असूनही पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या कोरोनाविरोधातील मोहिमांमुळे हा विभाग आता कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे.























































