पालिका प्रभाग आरक्षण बदलांसाठी शिवसेना आग्रही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रभागांच्या आरक्षण बदलांची मागणी सुरू झाली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीदेखील आता प्रभागांच्या आरक्षण बदलांचा मुद्दा ठरावाच्या सूचनेद्वारे महासभेत मांडला आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेदेखील याआधीच आरक्षण बदलाची भूमिका घेतली आहे.

देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते. जनगणना झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील विविध विभागांतील लोकसंख्या विचारात घेऊन निवडणूक प्रभागांची पुनर्रचना केली जाते. प्रभागांची पुर्नरचना करताना लोकसंख्या आणि प्रभागांची भौगोलिक व्याप्ती विचारात घेतली जाते. पुनर्रचना करताना नागरिकांच्या हितासाठी काही गोष्टींचे विभाजन होणार नाही, याची काळजी घेतली जाते. मुंबई पालिका अधिनियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील व्यक्ती, स्त्रीया आणि नागरिकांचा मागासवर्ग यासाठी जागा राखून ठेवण्यात येतात. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राखीव जागांची सोडत काढली जाते.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रभागांच्या आरक्षण बदलांचा मुद्दा ठरावाच्या सूचनेद्वारे महासभेत मांडला आहे. दर दहा वर्षांनी प्रभागांचे आरक्षण बदलता येईल, अशी मनपा अधिनियमन सुधारणा करावी. फेब्रुवारी 2022च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी याबाबत कार्यवाही सुरू करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. महासभेने ही सूचना मंजूर केल्यानंतर ती आयुक्तांच्या शिफारसीसाठी जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, योग्य पद्धतीने प्रभागांची फेररचना करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे याआधीच केली आहे.