येरवड्यात कैद्यांसाठी पहिली ओपन जिम, कैद्यांचे होणार सिक्स पॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कैद्याच्या फिटनेसवर भर देत तेलंगणा आणि तिहारच्या धर्तीवर राज्यात कैद्यांसाठी पहिली ओपन जिम येरवडा मध्यवर्ती जेलमध्ये यंदा सुरू होणार आहे. ओपन जिमला मिळणारा प्रतिसाद पाहून इतर मध्यवर्ती जेलमध्येही ही संकल्पना राबवली जाणार आहे.

तुरुंग प्रशासनाअंतर्गत राज्यात 9 मध्यवर्ती, 31 जिल्हा, 19 खुली कारागृहे आणि 172 उपतुरुंग आहेत. सध्या राज्यातील 46 तुरुंगात 30 हजार 644 कैदी आहेत. शिक्षाधीन असलेल्या कैद्यांना मानसिक नैराश्य येऊ नये म्हणून त्याची खबरदारी घेत ऑपरेशन ट्रकिंगच्या माध्यमातून त्या कैद्यांचे मानसोपचार तज्ञांकडून समुपदेशन केले जाते. आरोग्य आणि मनःशांतीसाठी कैद्यांना योगा, प्राणायामचे धडे दिले जातात. जेल प्रशासनाने कैद्याच्या फिटनेसचा विचार करून येरवडय़ाच्या मध्यवर्ती जेलमध्ये पहिली खुली जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ओपन जिममध्ये सायकलिंग, हात, पायाच्या व्यायामाच्या मशीनने कैदी फिटनेस वाढवू शकणार आहेत.

मुलाखत कक्ष सुरू होणार

कैद्याची नातेवाईकांशी भेट व्हावी यासाठी मुलाखत कक्ष सुरू केला होता पण कोरोनाचा धोका पाहता जेलमधील मुलाखत कक्ष तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला. कोरोनाची आटोक्यात आलेली स्थिती पाहून राज्यातील तुरुंगांत पुन्हा मुलाखत कक्ष सुरू होणार आहेत.

येरवडय़ात पहिली ओपन जिम होणार आहे. त्याला मिळणाऱया प्रतिसादानंतर मध्यवर्ती कारागृहात ओपन जिम सुरू करण्यात येईल. – सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक, (कारागृह व सुधारसेवा)