वेळेपूर्वीच संपणार ट्रम्प यांचा कार्यकाळ? बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्ये घातलेल्या गोंधळामुळे पोलिसांची आणि ट्रम्प समर्थकांची जुंपली. या हाणामारीत एका महिलेसह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या गोंधळामुळे नवे राष्ट्रपती जो बायडन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची संवैधानिक प्रक्रिया काही वेळ रखडली होती. काँग्रेस सदस्य बुधवारी इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी करत होते. त्यावेळी मोठ्या संख्येने ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यामुळे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.

या गोंधळामुळे प्रतिनिधी सभा आणि कॅपिटल इमारत बंद करण्यात आली. उपराष्ट्रपती माइक पेंस आणि खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परिस्थिती चिघळत असल्याने राजधानीत कर्फ्यू लावण्यात आला. तरीही कर्फ्यूचे उल्लंघन करत मोठ्या संख्येने ट्रम्प समर्थक रस्त्यावर उतरले होते. या गोंधळातच पोलीस बंदोबस्तात इलेक्टोरल कॉलेजची मतमोजणी करण्यात आली. बायडन यांना 270 मते मिळाल्याची पुष्टी झाल्यावर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. आता ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकी संसदेच्या दोन्ही सदनात नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या एरिझोना येथील विजयाला दिलेले ट्रम्प यांचे आव्हान फेटाळण्यात आले आहे. हे आव्हान रद्द करत बायडन यांचा एरिझोनातून विजय झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे आव्हान 93 च्या मताधिक्याने फेटाळण्यात आले. तसेच इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीला रिपब्लिकन पक्षाकडून देण्यात आलेले आव्हानही फेटाळण्यात आले आहे. 92 मतांनी हा आक्षेप फेटाळण्यात आला.

अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन 20 जानेवारीला पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याने 20 जानेवारीपूर्वीच कार्यकाळ पूर्ण होण्यआधीच ट्रम्प यांना पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. ट्रम्प यांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवण्याबाबत विचार सुरू आहे. अमेरिकेतील संविधानानुसार 25 व्या घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांना त्यांचे कॅबिनेट पदावरून हटवू शकते. त्यामुळे याबाबतही विचार सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय झाल्यास कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागणार आहे. अमेरिकेतील अनेक खासदारांनी ट्रम्प यांना पदावरून तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी दिल्यानेच कॅपिटल इमारतीतील घटना घडल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे.