
गेल्या 43 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत-पावसात दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलेल्या बळीराजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ट्रॅक्टररॅली आज दिल्लीच्या सीमेवर धडकली. कृषी कायदे रद्द न केल्यास राजधानीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची परेड होणार आहे. त्याची आज रंगीत तालीम झाली. जवानांची परेड बघितली आता अन्नदात्यांची परेड पहा अशी घोषणाच देण्यात आली आहे.
आज राजधानीच्या चारही सीमांपर्यंत ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या लांबच लांब ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्ली, हरियाणा आणि पंजाबच्या प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाची ही रंगीत तालीमच होती, असे गाजीपूर सीमेवर भारतीय किसान संघटनेचे प्रवत्ते राकेश टिपैत यांनी सांगितले.
महिलांना खास प्रशिक्षण
ट्रॅक्टर रॅलीसाठी मोठी तयारी सुरू असून काही महिलांनी या रॅलीसाठी ट्रॅक्टर चालवण्याचे खास प्रशिक्षणही घेतले होते. किसान एकता मंचने महिलांच्या ट्रॅक्टर रॅलीचा पह्टो ट्विट केला आहे. जवानांची परेड पाहिली आता शेतकऱ्यांची परेड पाहा. शेतकरीच खरा हिंदुस्थान आहे. मातीची सेवा करणारा प्रत्येक हात म्हणजेच शेतकरी. नारी शक्ती देखील शेतीत बरोबरीची भागीदार आहे. आता ट्रॅक्टर रॅलीने तुम्ही आदिशक्तीचे आगळे रूप पाहिले आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
…तर ‘तबलिगी’सारखी स्थिती होईल – सर्वोच्च न्यायालय
शेतकरी मोठय़ा संख्येने आंदोलन करीत आहेत हे आम्हाला माहिती आहे. या आंदोलनात कोरोना संसर्ग होऊ नये यासाठीच्या नियमांचे पालन होऊ शकते का, अशी विचारणा आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली. जर कोरोनापासून सुरक्षा नाही मिळाली तर तबलिगी जमातसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली. कोरोना लॉकडाऊन काळात तबलिगी जमातने मरकजचे आयोजन दिल्लीत केले होते. तेथे कोरोना नियमांचे पालन झाले नव्हते याकडे न्यायालयाने लक्ष वेधले आहे.
























































