
अपारंपरिक ऊर्जानिर्मिती धोरणाला राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चालना देणार आहे. अपारंपरिक ऊर्जास्त्रोतातून राज्यात वीजनिर्मितीला मोठा वाव असून पुढील चार वर्षांत 25 हजार मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प सरू करण्याची महाविकास आघाडीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामुळे राज्यात 85 ते 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. राज्यावर कोरोनाचे संकट असूनही या काळात ऊर्जा खात्याने घेतलेल्या महत्त्वांच्या निर्णयांची व भविष्यातील योजनांची माहिती डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षभरात कृषी पंप वीज जोडणी धोरण, अपारंपरिक ऊर्जा धोरण, कुसुम अभियान योजना ही तीन महत्त्वाची धोरणे आखल्याचे ते म्हणाले.
औाष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प नाही नवीन औाष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प न उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबईला अखंडित वीज
येत्या 2030पर्यंत मुंबई महानगर प्रदेशाची विजेची मागणी 5 हजार मेगावॅटपर्यंत जाणार आहे. यामुळे मुंबई परिसरातच वायू व अन्य पर्यायांद्वारे वीजनिर्मिती करून मुंबईला आत्मनिर्भर करणार असल्याचे नितीन राऊत म्हणाले. ग्रीड बंद पडल्यावर मुंबईला वीज पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी ऑयलँडिग यंत्रणेची फेररचना केली जाणार आहे.
कोविडकाळात वीज कापली नाही
वीजग्राहकांना दिलासा दिला आहे. एकरकमी वीज बील भरलेल्या घरगुती ग्राहकांना वीज बिलात दोन टक्के सूट दिली. तीन हप्त्यांत वीज बील भरण्याची मुभा देण्यात आली. स्थिर आकार उशिरा भरण्याची सवलत देण्यासह वीज बील भरले नाही तरी कोणाची वीज कापली नाही.
उद्योगांना दिलासा
उद्योगाचे वीज शुल्क 9. 30 टक्क्यांवरून 7.50 टक्के करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आर्थिक संकटाचा मुकाबला करणार्या उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय औद्योगिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरावर प्रतियुनिट 75 पैसे सवलत दिली आहे.
महत्त्वाच्या योजना
- दरवर्षी एक लाख कृषी ग्राहकांना सौर कृषिपंपाव्दारे वीज जोडणी.
- कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्पाने दिवसा आठ तास वीज.
- शेतकर्यांच्या वीज बिलांची 15 हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करणार.
- विविध अपारंपरिक ऊर्जास्त्रोतातून 2022पर्यंत 17 हजार 500 मेगावॅट वीजनिर्मिती.
- सौर कृषिपंपामुळे शेतीला दिवसाही वीज पुरवठा.
- ग्रामीण ऊर्जा कार्यक्रमाअंतर्गत 10 हजार घरांना सौरऊर्जा वीज.
- औद्योगिक व वाणिज्यिक वीज दर कमी करण्याची योजना.



























































