राजस्थान भाजपमध्ये फाटाफूट! वसुंधरा राजे समर्थकांकडून वेगळा गट स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थान भाजपमधील पक्षांतर्गत वाद अखेर चव्हाटय़ावर आला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पक्षात मिळत असलेल्या दुय्यम दर्जामुळे नाराज झालेल्या राजे समर्थकांनी भाजपला समांतर अशी वेगळ्या राजकीय मंचाची स्थापना केली. यामुळे राजस्थान भाजपमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजस्थानमधील सत्ताधारी कॉँग्रेसप्रमाणे विरोधी पक्षात असणाऱया भाजपमध्येही पक्षांतर्गत कुरबुरी सातत्याने वाढताना दिसत आहे. याचा थेट परिणाम पक्ष संघटनेवर होत असल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी दिल्लीत राजस्थानातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीपासून वसुंधरा राजे यांना दूर ठेवण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी ‘वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंच’ नावाने वेगळ्या गटाची स्थापना करून पक्ष संघटनेलाच आव्हान दिले आहे.

टीम वसुंधराची प्रत्येक जिल्ह्यात बांधणी

वसुंधरा राजे समर्थकांनी स्थापन केलेल्या संघटनेला ‘वसुंधरा राजे समर्थक राजस्थान मंच’ असे नाव दिले आहे. तसेच सोशल मीडियावरही ‘टीम वसुंधरा’ नावाने वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. त्याचबरोबर राजस्थानातील प्रत्येक जिल्ह्यात टीम वसुंधराची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाध्यक्ष, युवा आणि महिला संघटना पदाधिकाऱयांची नियुक्ती केली जात आहे.

…तर भाजप मजबूत होईल – भारद्वाज

वसुंधरा राजे या अतिशय लोकप्रिय नेत्या आहेत. त्या मजबूत झाल्या तर भाजप आपोआपच मजबूत होईल. त्यामुळे आम्ही वसुंधरा राजे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राजस्थानात जनसमर्थन उभे करण्याची तयारी करत असल्याचे वसुंधरा समर्थक मंचाचे प्रदेशाध्यक्ष विजय भारद्वाज यांनी म्हटले आहे.

भाजप व्यक्ती आधारित पक्ष नाही – पुनिया

राजे समर्थकांनी वेगळी संघटना स्थापन केली, याबाबतची माहिती भाजपच्या नेत्यांना आहे. जे लोक वसुंधरा राजे समर्थक मंचाचे काम करत आहेत ते लोक भाजपचे सक्रिय सदस्य नाहीत. भाजप हा काही व्यक्ती आधारित पक्ष नाही तर हा संघटना आधारित पक्ष असल्याचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी म्हटले आहे.