वरळी विभागात विकासकामांचा धडाका! आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षित-आकर्षक पदपथ, उड्डाणपुलाखालील लोकोपयोगी उद्यान, समुद्रकिनारा परिसर सुशोभीकरणासह विविध विकासकामांचा वरळी विभाग आणि परिसरात अक्षरशः धडाका सुरू आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही कामे होत आहेत. यातील काही कामांचे लोकार्पण तर काही कामांचा आढावा आदित्य ठाकरे यांनी आज घेतला.

वरळीत विभाग आणि परिसरात अनेक विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात येत आहेत. या कामातील सेनापती बापट मार्ग, दादर उड्डाणपुलाखालील प्रशस्त मोकळय़ा जागेत तयार होणाऱया लोकोपयोगी उद्यानाच्या कामाचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला. याशिवाय प्रभादेवी येथे समुद्रकिनारा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणीदेखील आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच श्री गणेश विसर्जन जेट्टी, वरळी पोलीस कॅम्प येथील डोंगराच्या ठिकाणी बांधण्यात येणारी धूप प्रतिबंधक भिंत, ‘बेस्ट’च्या माध्यमातून करण्यात येणारी प्रकाश योजना, लोअर परळ येथे नव्याने निर्माण होत असलेल्या उड्डाणपुलाची पाहणीदेखील आदित्य ठाकरे यांनी केली.

यावेळी माजी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख नगरसेवक आशीष चेंबूरकर, नगरसेवक अरविंद भोसले, नगरसेविका हेमांगी वरळीकर, नगरसेवक दत्ता नरवणकर, समाधान सरवणकर, उद्योजक हिंदुजा, अतिरिक्त आयुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त शरद उघडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे, निरंजन नलावडे, दीपक बागवे, संकेत सावंत, रामकृष्ण शिंदे, बाबू कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित वरळी!

शिवसेनेच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर, सुरक्षित वरळी करण्यासाठी वेगाने काम करण्यात येत आहेत. या विकासकामांतील वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौकातील पदपथ सुशोभीकरण, नवीन वाहतूक पोलीस चौकी, निरीक्षण केंद्र निर्मिती आणि डॉ. अॅनी बेझंट रोड लोटस येथील सुशोभित उद्यान आणि नंदीच्या भव्य प्रतिकृतीचे लोकार्पण यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.