
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी 13 जानेवारीपासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी’ राबविण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये कॉलेज अलॉट न झालेले, मिळालेला प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण, दहावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी असलेले विद्यार्थी या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीसाठी विद्यार्थ्यांचे त्यांना मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्ग ठरविण्यात आले असून 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पहिली संधी मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमे 80 टक्के व त्यापेक्षा, 70 टक्के व त्यापेक्षा जास्त, 60 टक्के व त्यापेक्षा जास्त, 50 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
शेवटची संधी; प्रवेश रद्द करताना विचार करा
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी ही अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी असून विद्यार्थ्यांनी मिळालेला प्रवेश रद्द करण्यापूर्वी विचार करावा, असे आवाहन शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे. तसेच 29 जानेवारीपासून एटीकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
आतापर्यंत झालेले प्रवेश
आर्टस् 19,346
कॉमर्स 1,11,211
सायन्स 63,300
एचएसव्हीसी 2279
एपूण 1,96,136
(मुंबई विभागात अकरावीच्या एपूण 3,20,390 जागा असून या प्रवेशानंतर 1 लाख 24 हजार 254 जागा रिक्त आहेत.)
असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
– 13 जानेवारी – 90 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
– 13 ते 15 जानेवारी – कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.
– 15 जानेवारी – रिक्त जागा जाहीर.
– 16 जानेवारी – 80 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
– 16 ते 18 जानेवारी – कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.
– 18 जानेवारी – रिक्त जागा जाहीर.
– 19 जानेवारी – 70 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
– 19 ते 20 जानेवारी – कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.
– 20 जानेवारी – रिक्त जागा जाहीर.
– 21 जानेवारी – 60 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
– 21 ते 22 जानेवारी – कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.
– 22 जानेवारी – रिक्त जागा जाहीर.
– 23 जानेवारी – 50 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
– 22 ते 25 जानेवारी – कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.
– 25 जानेवारी – रिक्त जागा जाहीर
– 27 जानेवारी – उत्तीर्ण प्रवर्गात असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश.
– 27 ते 28 जानेवारी – कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.
– 28 जानेवारी – रिक्त जागा जाहीर.

























































