
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, घर टू घर प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरूनही हायटेक प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवार आणि पॅनलप्रमुखांनी पायाला भिंगरी बांधली आहे. जाहीर प्रचाराला अवघे तीन दिवस उरले असल्याने ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंगचा वापर मोठय़ा प्रमाणावर होऊ लागला आहे. त्यामुळे सांगली, मिरजेतील सर्व रेकॉर्डिंग स्टुडिओ हाउसफुल झाले आहेत.
सांगली जिह्यात 152 ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरू आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, पण अन्य ग्रामपंचायतींमध्ये चुरशीचे सामने रंगले आहेत. ग्रामपंचायतींच्या प्रचारामुळे ग्रामीण वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा अगदीच नगण्य ठेवली आहे, पण दारू आणि मटण पाटर्य़ांवर लाखो रुपये खर्च होत आहेत. बाहेरगावच्या मतदारांना संपर्क साधून त्यांच्या येण्या-जाण्याची व्हीआयपी सोय केली आहेच. घाटमाथ्यावरील काही गावांमध्ये तर मतदारांना विमानाने आणण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
राज्यातील विकास महाआघाडी विरुद्ध भाजपच्या सामन्याचाही ग्रामपंचायत निवडणुकीवर परिणाम दिसून येत आहेच, पण बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाडय़ा आणि तडजोडीच्या पॅनलमध्येच प्रचाराचा धुरळा उडाला आहे. जाहीर प्रचाराची सांगता बुधवार, 13 जानेवारी रोजी होणार असल्याने प्रचार फेऱया आणि ‘घर टू घर’ प्रचाराचे रान तापले आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांनी अस्मितेचा प्रश्न निर्माण केले आहेत. चिकन, मटणाच्या जेवणावळी आणि दारूचा महापूर सुरू असून, विरोधकांच्या घरावर वॉच ठेवण्याचे आणि एकमेकांचे कच्चे दुवे शोधून मतदान वळवण्याचे काम सुरू आहे.
परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आपलेच पॅनल कसे श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. जिह्यातील बडय़ा नेत्यांचा या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसला तरी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक हालचालीवर बडय़ा नेत्यांचे लक्ष लागले असल्याने ग्रामपंचायतींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी आणि जेवणावळीवर भर देण्याबरोबरच सोशल मीडियावरून हायटेक प्रचारानेही जोर पकडला आहे. रेकॉर्डिंगच्या क्लिप, ऑडिओ आणि व्हिडीओंचा प्रचार सुरू आहे. मोबाईल टय़ुन वाजू लागल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील खर्चावरून लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. सांगली, मिरजेतील रेकॉर्डिंग स्टुडिओंत रात्रंदिवस रेकॉर्डिंग सुरू आहे.




























































