
मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील डबेवाल्यांची ख्याती सातासमुद्रापार पोहचली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर केला जात असून यास आळा घालण्यासाठी डबेवाल्यांच्या ‘नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट’ही मूळ संघटना पुढे सरसावली आहे. संघटनेने एक नवं शिवधनुष्य हाती घेतले असून संघटनेतर्फे एक नवी वेबसाईटची निर्मिती केली आहे. www.mumedbaieddabbawaleda.in असे या नव्या वेबसाईटचे नाव असून संघटनेला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा इतर मदत करताना या वेबसाईटवर खात्री करून घेण्याचे आवाहन ट्रस्टने केले आहे.
मुंबईतील डबेवाल्यांच्या कामांच्या नियोजनाचे कौतुक सर्वत्र केले जाते. याचाच फायदा उचलून काही जणांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केल्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. या सर्वांची गंभीर दखल आता मुंबईतील डबेवाला संघटनांनी घेतली आहे. मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ आणि नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट या दोन मुंबईतील नोंदणीकृत संघटनांनी याची गंभीर दखल घेतली आहे. यासाठी संघटनेने नवी वेबसाईट सुरू केली आहे. डबेवाला मंडळाशी संबंधित असल्याचा बनाव करणाऱया यापुढे कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील संघटनतर्फे दिला आहे.
कशी आहे वेबसाइट
मुंबईच्या डबेवाल्यांच्या या वेबसाइटवर डबेवाल्यांचा इतिहास देण्यात आला आहे. त्याशिवाय कोणकोणत्या ठिकाणी डबेवाले सेवा पुरवतात याची माहितीदेखील देण्यात आली आहे. आतापर्यंत कोणकोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्याचे प्रमाणपत्रदेखील पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त कोणाला डबेवाल्यांना देणगी अथवा इतर स्वरूपात मदत करावयाची असेल त्यासाठी विशेष भाग या वेबसाईटवर करण्यात आला आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांना मदत करण्यासाठी अनेकजण सढळहस्ते मदत करतात. यापुढे मदत करताना वरील वेबसाईट किंवा ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
याशिवाय कोणत्याही अधिक माहितीसाठी ट्रस्टने 9870419916 आणि 9892874265 हे दोन क्रमांक जाहीर केले असून यावर संपर्क साधता येणार आहे.
www.mumedbaieddabbawaleda.in असे या वेबसाईटचे नाव आहे. याबरोबरच [email protected] या ई–मेल आयडीवरदेखील संपर्क साधता येणार आहे.
































































