
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत कागदपत्रांअभावी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना आरक्षण शुल्काचा लाभ देण्याची तसेच पदवीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर पूर्ण शुल्क भरण्याची सक्ती करू नये या मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱया आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी प्रवेश नाकारण्यात येत आहेत. याविषयी अनेक विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, राज्याचे पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली.
या तक्रारींची दखल घेत आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे यांनी उदय सामंत यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. कागदपत्रांअभावी आरक्षित विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून प्रवेश झालेला असेल त्या विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेनंतरही आरक्षणाचा शुल्काचा फायदा द्या तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर प्रवेश घेण्याकरिता पूर्ण शुल्क भरण्याची सक्ती न करता तीन ते चार हप्त्यांत शुल्क भरण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी उदय सामंत यांनी दोन्ही मागण्या मान्य करून संबंधित यंत्रणेला अंमलबजावणीचे निर्देश दिले.






























































