
प्रख्यात शास्त्रीय गायक आणि व्यासंगी अभ्यासक ‘पद्मभूषण’ उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे वांद्रे येथील घरी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी गुलाम मुस्तफा यांना अर्धांगवायूचा झटका आला होता, तेव्हापासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे, गीता दत्त यांच्यासह हरिहरन, सोनू निगम, शान यांनी उस्ताद गुलाम मुस्तफा यांच्याकडे संगीत प्रशिक्षण घेतले होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
गुलाम मुस्तफा खान यांचा जन्म 3 मार्च 1931 रोजी बदायूमध्ये झाला. ते रामपूर-सहसवान घराण्याचे गायक होते. याशिवाय अन्य घराण्यांचे गायन त्यांनी आत्मसात केले होते. ते एक संशोधक आणि व्यासंगी अभ्यासक म्हणून ओळखले जात. प्राचीन हिंदुस्थानी संगीतावर त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यावर संगीत नाटक अकादमीने 1958 साली रेकाॅर्ड काढून त्या जतन करून ठेवल्या आहेत. हा बहुमान मिळवणारे ते पहिले युवा कलाकार होते. गुलाम मुस्तफा यांना 1991 मध्ये पद्मश्री, 2003 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2006 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्यावर सांताक्रूझ दफनभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी अनुप जलोटा, हरिहरन, सोनू निगम आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाची बातमी ऐकून मला अतीव दुःख झालंय. ते चांगले गायक आणि चांगला माणूस होते. माझी भाचीदेखील त्यांच्याकडे संगीत शिकली आहे. मी पण त्यांच्याकडे थोडे संगीत शिकले होते. त्यांच्या निधनाने संगीताची मोठी हानी झाली आहे. – लता मंगेशकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका





























































