
पाटण तालुक्यातील मोरणा विभागांमध्ये नाटोशी, कुसरुंड, वाडीकोतावडे, आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केले आहे.
मोरणा विभागातील नाटोशी, कुसरुंड, वाडीकोतावडे, आंब्रग ही सर्व गावे डोंगराच्या पायथ्याशी वसली आहेत. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. गावातील सर्व पाळीव जनावरे चरण्यासाठी डोंगरावर नेण्यात येतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.
बिबट्याच्या अचानक हल्ल्याच्या भीतीमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांत भीती पसरली आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या शिकारीसाठी बिबट्याचा गावाजवळचा संचार वाढला आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

























































