राज्यात आजपासून आठवडय़ातून चार दिवस लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱया कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. आठवडय़ातील चार दिवस राज्यातील 285 केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱयांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. शनिवारी शुभारंभ प्रसंगी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणेचे कौतुक केले. लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन अॅपबद्दल मुख्यमंत्र्यांनी या वेळी माहिती घेतली. या अॅपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱयांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

एका केंद्रावर दिवसाला 100 कर्मचाऱ्यांना लस

राज्यातील लसीकरण पेंद्रांवर दिवसभरात 100पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱयांना बोलविण्यात येईल. लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मुंबईत चार हजार जणांना लसीकरणाचे मेसेज

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून कोविन अॅपमधून चार हजार लाभार्थ्यांना व्हॅक्सिनेशनसाठी मेसेज पाठवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी अपेक्षित चार हजारांमधील केवळ 1 हजार 926 जणांना लस देता आली होती. कोविन अॅपमधून पाठवण्यात आलेले मेसेज अनेकांना मिळालेच नाहीत. त्यामुळे नोंदणी होऊनदेखील लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेता आली नव्हती. उद्यापासून या कर्मचाचाऱ्यांचे लसीकरण सुरू होईल. लसीकरण सुरू झाल्यानंतर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या एकाच सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे.

10 केंद्रांवर लसीकरण

मुंबईत दहा केंद्रांवर यंत्रणा सज्ज असून नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल; केईएम रुग्णालय, परळ; शीव रुग्णालय; कूपर रुग्णालय, विले पार्ले; व्ही.एन. देसाई रुग्णालय, विलेपार्ले; वांद्रे भाभा रुग्णालय; डॉ. आंबेडकर शताब्दी रुग्णालय, कांदिवली; राजावाडी रुग्णालय, घाटकोपर; बीकेसी कोविड सेंटरवर एकूण 40 बूथवर लसीकरण होणार आहे. तर राज्य सरकारच्या माध्यमातून जे.जे. रुग्णालयात एका बूथवर लसीकरण करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले. तर जेजेमध्ये दररोज 100 जणांना लस देण्याचे उद्दिष्टय़ ठेवण्यात आले आहे.