
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर मायदेशात परतलेल्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना क्वारंटाइन नियमातून सूट दिल्यामुळे त्यांना विमानतळावरून थेट घरी जाता आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून क्रिकेटपटूंना क्वारंटाइन नियमातून सूट देण्याबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर मुंबईत परतलेल्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना क्वारंटाइन न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ व प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुंबई महापालिकेच्या क्वारंटाइन प्रतिबंधात्मक नियमानुसार या सर्वांना क्वारंटाइन केले जाणार होते. मात्र 5 फेब्रुवारीपासून हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या क्रिकेटपटूंना कुटुंबासोबत काही वेळ घालवता यावा या उद्देशाने शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला सूचना देऊन मायदेशी परतलेल्या खेळाडूंच्या तत्काळ आरटीपीसीआर टेस्ट करण्यास सांगितले. सर्वांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.





























































