
कोरोनामुळे अनेक महाविद्यालये क्वॉरंटाइन सेंटर म्हणून वापरात आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून किती सेंटर कार्यरत आहेत, किती बंद झाली याची माहिती घेऊन येत्या काही दिवसांत महाविद्यालये खुली करण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सामंत म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून विद्यापीठे-महाविद्यालये खुली करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. राज्यात लसीकरण सुरू झाले असले, तरी मुंबई, पुणे यासारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे दूर झालेला नाही.
विद्यापीठ व महाविद्यालयांत येणा-या विद्यार्थ्यांची संख्या, प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत आपल्याला अजूनही ऑनलाइन शिक्षणावरच भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.






























































