
मुंबईचा कारभार हाकला जाणाऱ्या महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीत मुंबईकर आणि देश-विदेशातील पर्यटकांना शनिवार-रविवार ‘हेरिटेज वॉक’ घेता येणार आहे. या उपक्रमामुळे मुंबई आणि पालिकेचा गौरवशाली वारसा-जडणघडण उलगडला जाणार आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून, पालिका आणि राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होत्या.
महानगरपालिकेचे मुख्यालय असलेली फोर्ट येथील भव्य इमारत मुंबईसह महाराष्ट्र-हिंदुस्थानच्या जडघडणीची साक्षीदार राहिली आहे. गॉथिक शैलीत असलेल्या या देखण्या इमारतीची भुरळ देशी-विदेशी पर्यटकांना पडते. त्यामुळे या ऐतिहासिक इमारतीचे हेरिटेज सौंदर्य सर्वसामान्यांसह देशी-विदेशी पर्यटकांना पाहता यावे यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यालय इमारतीत ‘हेरिटेज वॉक’ सुरू करण्याची संकल्पना मांडली.
या उपक्रमाच्या शुभारंभामुळे येत्या शनिवारपासून हा ‘हेरिटेज वॉक’ सुरू होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालिका मुख्यालयाच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. दरम्यान, पालिका मुख्यालयाचा ‘हेरिटेज वॉक’ हा हिंदुस्थानातील पहिलाच उपक्रम असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
या कार्यक्रमप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, ‘सपा’चे गटनेते आमदार रईस शेख, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रद्धा जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, अमेय घोले, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सुरेश काकाणी, पी वेलरासू आदी मान्यवर उपस्थित होते.
ऐतिहासिक वारसा जपायला हवा! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘हेरिटेज वॉक’ उपक्रमामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या पालिका मुख्यालयाची हेरिटेज इमारत आता सर्वसामान्यांसह मुंबईकर-देशी-परदेशी पर्यटकांना पाहता येणार आहे. ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. पालिका इमारतीच्या रूपाने आपल्याला 125 वर्षांचा जो ऐतिहासिक, पुरातन वारसा लाभला आहे तो आपण पुढे नेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
असा राबवणार उपक्रम
मुंबईकर-पर्यटकांना शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पालिका मुख्यालयात गाईडच्या उपस्थितीत हेरिटेज सफर घेता येणार आहे. यावेळी इमारतीमधील महापुरुषांचे पुतळे, समिती सभागृहे, हेरिटेज शैलीतील बांधकामांचे महत्त्व गाईडकडून सांगितले जाईल. यामध्ये शनिवारी दोन बॅच आणि रविवारी दोन बॅचना ही सफर घडवली जाईल. एका बॅचमध्ये 15 जणांचा समावेश राहील. याचे बूकिंग बुक माय शोवर करावे लागणार आहे.
शनिवारी सायंकाळी 4 वाजता, 5.30 वाजता आणि रविवारी सकाळी 9 ते 10.15 ते 10.30 ते 12 अशी दुसरी बॅच असेल. पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर आवश्यकतेनुसार वाढवली जाणार असल्याची माहिती खाकी हेरिटेज फाऊंडेशनचे भारत गोठसकर यांनी दिली.
मुंबईत अनेक पुरातन वास्तू पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये माहीम, शिवडी, शीव, वांद्रे अशा किल्ल्यांसह अनेक हेरिटेज इमारती पाहण्यासारख्या आहेत. या वास्तूंचा ऐतिहासिक वारसा जपणे आणि तो पुढे नेणे आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या शिवाय मुंबईत चिरंतन स्वरूपाची नवनवीन निर्मिती घडवून त्याचा आदर्श जगासमोर उभा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. हेरिटेज वॉकमुळे आता इमारतीच्या ऐतिहासिक भिंती, पुतळे, ठिकाणे बोलू लागतील असेही ते म्हणाले. मी 13 ते 14 वर्षांचा असताना महापौर निवडणुकीवेळी पालिकेच्या गॅलरीतून ते सर्व नाटय़ अनुभवले होते.
मात्र यावेळी पालिकेच्या सभागृहात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून येईन असे वाटले नव्हते, असा उल्लेख करतानाच नवीन सहकाऱ्यांमुळे ही संधी मिळाली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नाईट लाईफ ही मुंबईची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई ही अनेक रंगढगांनी नटलेली आहे. कधीही न थकणारे, न थांबणारे हे शहर आहे. नाईट लाईफ ही वेगळी दुनिया आहे. तरुण वर्गाला नाईट लाईफचे मोठे आकर्षण आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठी नाईट लाईफ ही संकल्पना जोरदारपणे मांडली आहे.
आताच्या काळात नाईट लाईफ ही मुंबईची गरज आहे. मात्र, नाईट लाईफ सुरू झाल्यानंतर सुरक्षितता महत्त्वाची आहे. मात्र, ती काळजीही योग्य रितीने घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंबईत राहूनही गेली कित्येक वर्षे मला ही ऐतिहासिक वास्तू पाहता आली नाही. मात्र, आदित्य यांनी सुरू केलेल्या या हेरिटेज वॉकमुळे मला ही वास्तू पाहण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांचा ही आभारी आहे. हेरिटेज वॉकला मुंबई तसेच देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळेल. त्यामुळेही मुंबईला एक वेगळी ओळख मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
हा स्वप्नपूर्तीचा क्षण – आदित्य ठाकरे
पर्यटनविभागाचे काम करताना मी आणि माझी टीम वेगवेगळ्या संकल्पनांवर मनापासून काम करतो. युरोप आणि इतर देशांमध्ये हेरीटेज वास्तूची सफर घडवली जाते. तेथील विविध इमारती, टाऊनहॉल, तेथील नक्षीकाम दाखवले जाते. या धर्तीवर मुंबई महापालिकेची ही ऐतिहासिक इमारत नेमकी आहे तरी कशी, हे या नव्या उपक्रमातून सर्वसामान्यांना पाहता येणार आहे.
ऐतिहासिक वारसाला भलेली अशी वास्तू देशात पुठेही नाही. मुंबईकर तसेच देशी-विदेशी पर्यटकांना या वास्तूचे आकर्षण आहे. हा उपक्रम सुरू करणे, हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. आगामी काळात याच धर्तीवर ’स्टेडियम एक्सपेरियन्स’ हा उपक्रम सुरू करता येईल. यात स्टेडियममधील विविध कक्षजसे ड्रेसिंग रूम अशा गोष्टी जवळून पाहता येईल.
मुंबई उच्च न्यायालय आणि गेट वे ऑफ इंडियासाठी अशा प्रकारे हेरिटेज सफर सुरू करता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर रस्त्यांची गाईड टूरही सुरू करता येईल. यात ज्या व्यक्तींचेनाव रस्त्याला देण्यात आले आहे त्या रस्त्यांच्या नावांना बारकोड देण्यात येणार आहे. यात त्या व्यक्तीची सगळी माहिती असेल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

































































