
चहा हे अनेकांचं आवडीचं पेयं आहे. रोजचे ताणतणाव, त्रास यांना एका घोटात बाजूला सारण्याची किमया चहात असते. म्हणून लोक आवडीने चहा पितात. जे डाएट करतात ते ग्रीन टी पितात. तर काहींना लेमन टी आवडतो. पण, सध्या लेमन टी, ग्रीन टी यांच्यापेक्षा निळा चहा म्हणजेच ब्ल्यू टी जास्त लोकप्रिय होत आहे.
निळा चहा? ऐकून आश्चर्य वाटलं ना..? पण हो.. हा चहा सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे. याचं कारण, एक तर याचा रंग.. जो गुलबट निळा दिसतो. आणि दुसरं याची चव. साध्या ग्रीन टी पेक्षा हा खूप वेगळा लागतो.
निळा चहा बनवण्याची रेसिपी अगदीच सोपी आहे. पण, त्यासाठी लागणारा जिन्नस मात्र खास आहे. हा निळा चहा विशिष्ट फुलांचा बनतो. त्या फुलाला मराठीत गोकर्ण किंवा हिंदीत अपराजिता असं म्हटलं जातं.
गोकर्णाची ताजी फुलं घ्यावीत. ती कपभर गरम पाण्यात टाकावीत आणि ढवळावीत. हळूहळू पाण्याला निळा रंग चढू लागतो. ज्यांना गोड आवडतं, त्यांनी थोडी साखर टाकायला हरकत नाही. नाहीतर तो अगोड प्यायला तरीही चालतो.
गोकर्णाच्या फुलांमध्ये रक्त शुद्ध ठेवणारी काही रसायनं असतात. त्यामुळे हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या फुलांचा वापर सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठीही होतो. तसंच, गोकर्णाच्या मुळांचा लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचाही उजळते.























































