
जालना तालुक्यातील नंदापुर शिवारातील समृध्दी महामार्गावरुन मौल्यवान गौण खनिज गारगोटीची वाहतूक करताना जालना तालुका पोलिसांनी सापळा रचून गारगोटी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौल्यवान गौण खनिज असलेल्या गारगोटी चोरीच्या घटना काही दिवसांपासून घडत होत्या. ही चोरी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांना मौल्यवान गौण खनिज गारगोटीची चोरटी वाहतूक एक टाटा टेम्पोतून 4-5 जण करत असल्याची माहिती शुक्रवारी मिळाली. ते चोरटे नंदापूर शिवारात समृध्दी महामार्गावरुन वाहतूक करत असल्याचे त्यांना समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांनी सापळा रचला.
पोलीस पथकाने शिताफीने मौल्यवान गौण खनिजासह टेम्पो ताब्यात घेत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बागुल, पोलीस उपनिरीक्षक बगाड, संदीप उगले, वसंत धस, कृष्णा भडांगे, दिगंबर चौरे, सिंघल, चालक नागरे यांनी केली आहे.




























































