
नाना पेठेत दहशत निर्माण केल्याने तरूणावर गोळीबार केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील आठजणांना अटक करण्यात आली आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 31), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (वय 25), ओंकार शिवप्रसाद साळुंके (वय 21, तिघे रा. डोके तालीम, नाना पेठ), विराज जगदीश यादव (वय 25,रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर), आवेझ अश्फाक सय्यद (वय 20, रा. गणेश पेठ), शहावेज अब्दुल रशीद शेख (वय 34, रा. गुरुवार पेठ), अक्षय नागनाथ कांबळे (वय 23, रा. ससाणेनगर, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. विघ्नेश अशोक गोरे (वय 20,रा. कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
विघ्नेश 23 जानेवारीला त्याचे मित्र अतुल दरेकर, इश्वर म्हस्के दुचाकीवरून कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन चालले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आंदेकर आणि साथीदारांनी विघ्नेशवर पिस्तुलातून गोळीबार केला होता. पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता.
या प्रकरणात विघ्नेश गोरेची चौकशी करण्यात आली होती. चौकशीत त्याने नाना पेठेत दहशत निर्माण केली होती. या कारणावरुन कृष्णराज आंदेकर आणि साथीदारांनी विघ्नेश गोरेला गाठून त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आठजणांना अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या पथकाने केली आहे.



























































