
राज्यातील घरगुती वीज ग्राहकांचे लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्याची दखल घेत वीज बिल माफीसाठी बैठक घेण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना शिफारस करू असे आश्वासन पवार यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
कोरोना महामारीमुळे राज्यात 22 मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पुढे सहा महिने सर्वसामान्य नागरिक घरात बसून होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले होते, तर विजेचा वापर वाढला होता. त्यामुळे घरगुती ग्राहकांना वाढीव बिले आली आहेत. मात्र हाताला कामच नसल्याने ग्राहकांनी सदर बिले भरायची कशी ? असा सवाल वीज ग्राहक संघटनेने करत वेळोवेळी वीज बिल माफीची मागणी केली आहे. मात्र सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहक संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी, संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्यासह शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेत वीज बिल माफीचे निवेदन दिले. त्याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेली नवीन कृषी वीज बिल सवलत योजना यशस्वी होण्यासाठी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.



























































