
आपण जिवंत माणसांशी फोनवर बोलतो, पण मेलेल्या माणसांबरोबर बोलता आले तर? त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या तर..विश्वास बसत नाही? पण हे खरं आहे. एका जगप्रसिद्ध कंपनीने असा दावा केला आहे.
कॉम्प्युटर जगतात क्रांती आणणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीने नुकतेच ‘चॅटबोट’ या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मेलेल्या माणसांसोबत गप्पा मारता येणार आहे असा दावा केला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या चॅटबोट या सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनद्वारे दोन व्यक्तींना संपर्क साधता येणार असल्याचा दावा केला आहे. त्याचे पेटंटही घेतले आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टला एका अशा चॅटबोटसाठी पेटंट देण्यात आलं आहे. ज्याच्या माध्यमातून मृत व्यक्तींशी संपर्क साधता येणार आहे. यामध्ये मित्र, नातेवाईक, सेलिब्रिटीज, अनोळखी माणसं यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
ब्लॅक मिरर या वेब सिरीजपासून या चॅटबोटच्या निर्मितीची प्रेरणा घेतली असल्याचं बोललं जात आहे. वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या कथानकानुसार, एका अशाच अॅपच्या माध्यमातून एक प्रेयसी आपल्या मृत प्रियकरासोबत चॅट करते. मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टच्या या चॅटबोटमुळे मृत व्यक्तींच्या सोशल प्रोफ्रईलमधून त्यांचा डेटा घेतला जाणार. त्यानंतर मिळालेल्या डेटातून चॅटबोटचा प्रोग्रॅम तयार केला जाणार. त्यानुसार मृत व्यक्तींशी गप्पा मारता येणार आहेत.
पण सध्या मायक्रोसॉफ्ट हा चॅटबोट लॉन्च करण्याच्या विचारात नाही. कारण, मृत व्यक्तींसोबत बोलायला मिळणार याबाबत अनेकजण आनंदी आहेत, मात्र जगभरातल्या अनेकांकडून या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे. काही नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे, तर काहींनी हे सगळंच विलक्षण हादरवणारं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने सध्यातरी हा चॅटबोट लॉन्च करणार नसल्याचे सांगितले आहे.


























































