देशाचे पहिले पेपरलेस बजेट ‘मेड इन इंडिया’ टॅब्लेटवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचा अर्थसंकल्प आज सादर केला गेला. हिंदुस्थानच्या इतिहासातील हा पहिला ‘पेपरलेस’ अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो ‘मेड इन इंडिया’ टॅब्लेटवरून संसदेत मांडला. सर्व खासदारांनाही तो मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आला. देशातील नागरिकांनाही तो ‘युनियन बजेट’ या अॅपवर पाहता येईल.

यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांच्या प्रिन्ट काढल्या गेल्या नाहीत. यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या प्रेसमध्ये अर्थसंकल्पाच्या प्रिन्ट काढल्या जात होत्या. त्या कामासाठी 100 कर्मचारी असायचे. प्रिन्ट काढणे, सील करणे आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी त्या सर्वांना पोहोचवणे अशा कामांसाठी पंधरा दिवस हे कर्मचारी घरी न जाता एकत्र रहायचे. इतकेच नव्हे तर त्यांना मोबाईल पह्न आणि इंटरनेट जवळ बाळगण्यासही मनाई असायची.

पहिल्यांदाच बनवला गेला बजेट अॅप

अर्थसंकल्प देशातील नागरिकांनाही पाहता यावा म्हणून यंदा पहिल्यांदाच ‘युनियन बजेट’ नावाचा मोबाईल अॅप बनवला गेला. अर्थ मंत्रालयाने 6 जानेवारी रोजी तो लॉन्च केला होता. अर्थमंत्र्यांच्या आजच्या भाषणानंतर अर्थसंकल्पातील प्रमुख 14 कागदपत्रे या अॅपवर खासदार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अपलोड करण्यात आली.

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातही नाराजी

अर्थसंकल्पाबद्दल बाजारामध्ये चांगली प्रतिक्रिया असली तरी सर्वसामान्यांमध्ये मात्र नाराजी आहे. अगदी भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधील नागरिकही अर्थसंकल्पातील तरतूदींबद्दल समाधानी नाहीत असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. 71 टक्के लोकांनी हा अर्थसंकल्प महागाई वाढवणारा असल्याचे म्हटले आहे. 56 टक्के लोकांनी हा अर्थसंकल्प खराब असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अशी प्रतिक्रिया देणार्या लोकांमध्ये गुजरात, मध्यप्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचा समावेश आहे. सोशल मिडियावरही सुमारे 69 टक्के लोकांनी आजच्या अर्थसंकल्पाविरोधात मत दिले आहे.

नरेंद्र मोदी सरकारने ‘डिजिटल इंडिया’ला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आजच्या अर्थसंकल्पाप्रमाणे मोदी सरकारने यापूर्वीही अनेक अशा गोष्टी केल्या ज्या देशात पहिल्यांदाच झाल्या. 

– 2020 मध्ये पहिल्यांदाच देशात दोन पध्दतीची करपध्दती आणली गेली.

– 2019 मध्ये 159 वर्षे जुन्या ब्रीफकेसमधून अर्थसंकल्पाची प्रत घेऊन जाण्याची परंपरा समाप्त करण्यात आली.

– 2017 मध्ये 92 वर्षात पहिल्यांदाच रेल्वे अर्थसंकल्प सादर झाला नाही.

– 2018 मध्ये पहिल्यांदाच स्वदेशी वस्तूंच्या किमती अर्थसंकल्पानंतर कमी न होता वाढल्या.