
रस्त्याने आरडा-ओरडा न करता शांतपणे घरी जा, तुमच्या गोंधळामध्ये खाली पडून कोणीतरी जखमी होईल असे सांगितल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने वाहतूक शाखेतील सहायक पोलीस निरीक्षकाला काठीने माहरण केल्याचा धक्कादायक प्रकार वानवडीत घडला आहे. याप्रकरणी चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेआठच्या सुमारास वानवडीतील कमांड हॉस्पिटलच्या मागील बाजूस घडली.
किशोर लक्ष्मण खंडाळे (वय 18, रा. फातिमानगर), सनी रणजित टाक (वय 24), शैलेश रवीकांत पुणेकर (वय 22, रा. मार्केटयार्ड), आकाश शशिकांत जाधव (वय 26, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक गोविंद जाधव वाहतूक विभागात कार्यरत असून 31 जानेवारीला ते हद्दीत कारवाई करीत होते. त्यावेळी दुचाकीवर जात असताना टोळके हातातील काठ्या रस्त्यावर घासून आरडा-ओरडा करीत चालले होते.
त्यावेळी गोविंद यांनी संबंधित दुचाकीस्वारांना अडवून घरी शांतपणे जाण्याचा सल्ला दिला. रस्त्यावर काठ्या घासून गोंधळात कोणीतरी खाली पडल्यास जखमी होईल असे त्यांनी म्हटले. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने त्यांना काठीने मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे तपास करीत आहेत.






















































