कोरोनामुळे माघीवारीचा सोहळा रद्द, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाने 28 फेब्रुवारी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्याने, 23 फेब्रुवारी रोजी पंढरपूर मध्ये भरणाऱ्या माघीवारीचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दशमी आणि एकादशीला श्री विठ्ठल मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने भाविकांनी वारीच्या सोहळ्यासाठी येऊ नये असे आवाहन समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरीता दररोज हजारो भाविक पंढरीत येतात. तर येत्या 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन जाहीर केलेले आहे. याची दखल घेऊन गर्दी होऊ नये. म्हणून माघी यात्रेत दशमी आणि एकादशी दिवशी (ता. 22 व 23 फेब्रुवारी) असे दोन दिवस श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात भाविकांना सोडण्यात येणार नाही. तर दि. 24 पासून म्हणजेच द्वादशी पासून भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात पूर्ववत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.

माघी यात्रेच्या नियोजना संदर्भात मंगळवारी 2 रोजी श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची बैठक सहअध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित होते.

सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, कोरोनाचे सावट अजून पूर्ण संपलेले नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. अद्याप लसीकरण पुर्ण झालेले नाही. यातच येत्या 23 फेब्रुवारी रोजी माघी एकादशीचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला भाविक पंढरपूरला मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून दशमी आणि एकदशी असे दोन दिवस भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असताना मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भाविकांना येऊ द्यायचे किंवा नाही या विषया संदर्भात शासन निर्णय घेईल. मात्र, यात्रा काळात एकदशीपासून पौर्णिमेपर्यंत परंपरेनुसार जे नियम चालत आलेले आहेत ते सर्व होतील, असेही सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.