महानिर्मितीची रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती, महिनाभरात 5111 दशलक्ष युनिट विजेचा महावितरणला पुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानिर्मितीने प्रथमच रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती केली आहे. लॉकडाऊननंतर राज्यातील उद्योग, व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने दररोज सरासरी सात हजार मेगावॅट एवढी वीजनिर्मिती करत महावितरणला तब्बल 5 हजार 111 दशलक्ष युनिट वीज पुरवली आहे. यापैकी सर्वाधिक 4500 दशलक्ष युनिट वीज औष्णिक वीज प्रकल्पातील आहे.

महानिर्मितीची एकूण स्थापित वीजनिर्मिती क्षमता 13 हजार मेगावॅटच्या घरात आहे. पण सुमार कामगिरीमुळे आतापर्यंत महानिर्मिती महिन्याला जास्तीत जास्त साडेचार हजार दशलक्ष युनिट एवढाच वीजनिर्मितीचा टप्पा गाठत होती. मात्र महानिर्मितीने कोळशाच्या वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याबरोबरच आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा केल्याने गेल्या सहा महिन्यांत त्याचा प्रतियुनिट वीजनिर्मितीचा खर्च सरासरी 20-25 पैशांनी खाली आला आहे. महावितरण वीज खरेदी करताना कमी दराच्या विजेला प्राधान्य देत. त्यामुळे महावितरणच्या वीज खरेदी निकशाप्रमाणे महानिर्मितीची वीज इतर खासगी वीज प्रकल्पांच्या तुलनेत काहीशी स्वस्त झाली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात महावितरणने महानिर्मितीकडून पाच हजार दशलक्ष युनिटहून अधिक वीज खरेदी केली आहे. दरम्यान महानिर्मितीने महिनाभरात पुरवलेल्या विजेमध्ये सर्वाधिक 4514 दशलक्ष युनिट वीज औष्णिक वीज प्रकल्पातून घेतली आहे. तर वायू वीज केंद्रातून 187 दशलक्ष युनिट, जलविद्युत प्रकल्पातून 388 दशलक्ष युनिट तर सौर ऊर्जा प्रकल्पातून 21 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.

दैनंदिन 10 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सज्ज

महानिर्मिती सध्या महावितरणच्या मागणीनुसार दररोज सरासरी सात हजार मेगावॅट एवढी दररोज वीजनिर्मिती करत आहे. राज्याची विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी दररोज दहा हजार मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीज निर्मिती करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.