
सह्याद्रीचा मुकुटमणी म्हणून ज्या गडाची इतिहासाला ओळख आहे अशा प्रचितगडावर पोहचणे म्हणजे जीवाशी गाठच . अशा स्थितीत 25 वर्षांपूर्वी इतिहास प्रेमींनी अफाट कष्ट घेत गडावर पोहचण्यासाठी लोखंडी शिडी बसवली . मात्र पाऊस , वारा आणि उन यामुळे गेल्या काही वर्षात या शिडीच्या पायऱ्या गंजल्या असून सुरुवातीच्या पायऱ्या मोडून पडल्याने इतिहास प्रेमींसाठी आता ही शिडी अक्षरशः जीवघेणी ठरत आहे . पुरातत्व विभागाने या शिडीची तातडीने दुरुस्ती करावी आणि याकामी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी इतिहास प्रेमींनी केली आहे .
संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर ही छत्रपती संभाजी महाराज यांची सासूरवाडी . या गावापासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुरु होतात . आकाशाला गवसणी घालणाऱ्या या पर्वतरांगात अति उंचावर प्रचितगड उभारण्यात आला आहे . या गडावर पोहचणे स्वराज्याच्या काळात देखील मोठे अवघड समजले जायचे . शत्रू तर या गडावर कधीही पोहचू शकला नाही . स्वराज्यातील या अजिंक्य गडाचा उल्लेख सह्याद्रीचा मुकुटमणी असाच होवू लागला. आजही या गडावर भवानी मातेचे छोटेखानी मंदिर, तीन तोफा, मे महिन्यातही थंडगार आणि मुबलक असणारे पाणी , एक पडकी गढी , कातळात खोदलेली पाण्याची टाकी अशी ठिकाणे पहाण्यासारखी आहेत . शृंगारपूर मार्गे गडावर जायला असणारी वाट अत्यंत धोक्याची असून साडेतीन तास सलग चढण पार केल्यानंतर गडावर पोहचता येते . नेरदवाडी मार्गे असणाऱ्या वाटेने गेल्यास धोका कमी असून यामार्गे सहा तासांची पायपीट करावी लागते . कोणत्याही मार्गाने जायचे असेल तरी , हा भाग संरक्षित वनक्षेत्रात येत असल्याने वन विभागाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक ठरते .
प्रचितगडावर असणारी दगडी पायऱ्यांची रचना ढासळल्यानंतर गडावर अनेक वर्षे जाताच येत नव्हते . यामुळे इतिहास प्रेमींच्या मनात कायम खंत वाटत रहायची . अखेरीस ठिकठिकाणच्या इतिहास प्रेमींनी कमालीची मेहनत घेऊन जिद्दीच्या जोरावर गडावर पोहचण्यासाठी शिडी बनवली . मात्र ही शिडी गडापर्यंत नेणे हे काम अत्यंत जिकरीचे होते . छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला नमन करत असंख्य वीरांनी अक्षरशः जीवाचा कोट करुन 25 वर्षांपूर्वी एक भली मोठी आणि मजबूत शिडी गडावर पोहचण्यासाठी बसवली . त्यानंतर जल्लोष करत आजवर हजारो शिवभक्त आणि इतिहास प्रेमींसह गिर्यारोहक प्रचितगडावर पोहचू शकले . गेल्या 25 वर्षात कडक उन , भयाण वारा आणि मुसळधार पाऊस अशा वातावरणाला सतत तोंड दिल्याने ही शिडी गंजत कमकूवत होत गेली .
प्रचितगडाच्या प्रवासात अखेरच्या टप्प्यात ही शिडी असून ही शिडी खिळखिळी झाल्याने पर्यटक त्यावरून जात असताना खूप हलते. एकावेळी एकच माणूस यावरुन जावू शकतो . शिडीवरुन जातांना नजर गडाच्या टोकाकडे ठेवावी लागते . खाली पाहिले तर , खूप खोल दरी असल्याने गडावर जाण्यासाठी पाऊल उचलले जात नाही . गंजलेल्या शिडीच्या सुरुवातीच्या पायऱ्या कमकुवत झाल्या आणि काही कालावधीनंतर मोडून पडल्यामुळे आता गडावर पोहचणे म्हणजे जीवावरचा खेळ ठरत आहे . सुरुवातीच्या सहा पायऱ्या मोडून दरीत पडल्या असून वरच्या बाजूच्या पायऱ्या वाकड्या झाल्या आहेत . सद्यस्थितीत इतिहास प्रेमी या शिडीवरुन जीवावर उदार होवूनच गडावर जावून परतत आहेत . पुरातत्त्व विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या शिडीच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करावेत अन्यथा एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे .
काही वर्षांपूर्वी संगमेश्वर येथील इतिहास प्रेमीं युवकांनी प्रचितगडावरील भवानी मातेच्या मंदिरावर मोठ्या मेहनतीने साहित्य नेवून पत्र्याचे छप्पर केले होते . संगमेश्वर येथील युवकांनी प्रचितगडावर जाण्यासाठी असणाऱ्या शिडीची जी दुर्दशा झाली आहे त्याकडे संबधितांचे लक्ष वेधावे अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे . याबाबत संगमेश्वर येथील इतिहास प्रेमी युवकांनी एका बैठकीचे आयोजन केले असून प्रचितगडावरील शिडीच्या दुरुस्तीबाबत या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे स्पष्ट केले .






























































