सरकार योग्य कारवाई करत असल्याची खात्री, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

शेतकऱ्य़ांच्या ट्रक्टर रॅलीवेळी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराची निश्चित कालावधीत चौकशी व्हावी. त्यासाठी न्यायालयाने आयोगाची नेमणूक करावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

26 जानेवारीच्या हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयासमोर तीन याचिका दाखल झाल्या आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठापुढे याचिकांची सुनावणी झाली. आम्हाला खात्री आहे की, हिंसाचार प्रकरणाची चौकशी सरकारकडून सुरू आहे आणि योग्य कारवाई केली जात आहे.

आम्ही पंतप्रधान मोदींचे वक्तव्यही वाचले आहे. कायदा आपले काम करेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी सांगितले.

याचिकाकर्त्यांना वाटले तर ते सरकारकडे निवेदन करू शकतात असे सरन्यायाधीश म्हणाले. या याचिकेसह ट्रक्टर रॅलीसंबंधी अन्य दोन याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सरकारकडे आपले निवेदन सादर करण्याची सूचना केली.

थरुर, सरदेसाईंची न्यायालयात धाव

ट्रक्टर रॅलीतील हिंसाचाराबाबत दिशाभूल करणारे ट्विट केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यावर विविध ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आले. त्याविरोधात दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.