
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी पंधरा दिवसांत 18 टक्क्याने घटली आहे. सध्या कॅनॉल, बोगदा व नदीद्वारे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून पाणी सोडले जात आहे. यंदाच्या वर्षी लांबलेला पावसाळा व अतिवृष्टीमुळे उजनी 111 टक्के भरले होते. 19 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान उजनीतील पाणीपातळी 18 टक्क्यांनी खालावली आहे.
यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्हय़ात चांगल्या पावसाबरोबरच अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे पाण्याची मागणी म्हणावी तशी नव्हती. रब्बीचे पहिले आवर्तन सोडताना उजनीत 104 टक्के पाणी शिल्लक होते. 19 जानेवारीपासून भीमा नदीत सोलापूर शहरासह नदीकाठच्या योजनांसाठी पाणी सोडण्यात आले. शहरात पाणीपुरवठा करणारा औज बंधारा भरला असून, शहरवासीयांचा दोन महिन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्याचबरोबर कॅनॉल व बोगद्याद्वारेही भीमाकाठच्या योजनांसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
बुधवारी सायंकाळी धरणात एकूण पाणीसाठा 110.01 टीएमसी असून, यात उपयुक्त पाणीसाठा 46.35 टीएमसी आहे. सध्या 86.52 टक्के इतका पाणीसाठा असून, मुख्य कालव्यातून दोन हजार क्युसेक, बोगद्यातून 900, सीना-माढा योजनेतून 222, दहिगाव सिंचन योजनेतून 105 क्युसेक पाणी शेतीसाठी सोडण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आहे.























































