
>> डॉ. सरिता विनय भावे
लाल, पिवळ्या, पांढऱया फुलांची झाडे नेहमीचीच असल्यामुळे आकाशाच्या पार्श्वभूमीवर हिरव्या पानांसोबत निळ्या-जांभळ्या फुलांचा पिसारा मिरवणारा ‘जॅकरांडा’ बघताक्षणी थेट हृदयातच शिरतो. रस्त्यांच्या दुतर्फा, आलटून पालटून लावलेल्या जॅकरांडा-बहाव्याच्या बहरलेल्या झाडांची कमान होऊन ती छत्रचामरे ढाळत असल्याचा भास होतो. नकळत ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा…’ या काव्यपंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. स्वप्नातल्या गावाकडे नेणारी वाट अशी ‘स्वप्नील’ करणाऱया जॅकरांडाचे ‘हृदयस्थ’ असणे म्हणूनच आश्चर्यचकित करीत नाही.
आल्हाददायक, शीतल फुलांमुळे ‘शोभेचा वृक्ष’ म्हणून जगभर जॅकरांडा या झाडाची ख्याती आहे. असंख्य जॅकरांडांमुळे खुलून दिसणाऱया द. आफ्रिकेतील ‘प्रिटोरिया’ शहराला तर काwतुकाने ‘जॅकरांडा सिटी’च म्हणतात. ऑस्ट्रेलियातील ‘ग्रॅफ्टन’ शहर ‘जॅकरांडा फेस्टिव्हल’साठी सुप्रसिद्ध आहे. मूळच्या द. अमेरिकेतील या झाडाला ब्लू जॅकरांडा, ब्लॅक पुई, फर्न ट्री या नावांनीही ओळखतात. Jacaranda mimosifolia नावाच्या आपल्यासाठी ‘पाहुणा’ असलेल्या या वृक्षासाठी ‘नीलमोहर’ असे नितांतसुंदर देशी नाव सुचवणाऱया व्यक्तीच्या रसिकतेला भरभरून दाद द्यायलाच हवी. कारण फुले नसताना पानांतील साम्यामुळे हा ‘गुलमोहर’सारखाच वाटतो (पण दोघांची ‘पुळे’ वेगवेगळी आहेत).
झाडाचे खोड राखाडी-काळपट, उभ्या रेषांचे, खडबडीत असते. पाने हिरवी, छोटय़ा झावळीसारखी वाटतात. संयुक्त पानांच्या मध्य शिरेच्या दोन्ही बाजूला जोडीजोडीने नाजूक, टोकदार पर्णिका असून टोकाला एकच पर्णिका असते. हिवाळ्यात पानगळ झाल्यावर वसंत ऋतूच्या आगमनावेळी हा बहरायला लागतो. झाडाला फुटभर लांबीच्या मंजिऱया येतात आणि असंख्य निळ्या-जांभळ्या फुलांनी त्या लगडून जातात. एकत्र जुळलेल्या पाच पाकळ्यांची फुले घंटीसारखी वाटतात. फुलांचा सुवास खूपच मंद असतो, पण फुलांतील परागकण गोळा करणारे माव्यासारखे कीटक मधासारखा गोड-चिकट द्रवपदार्थ पाकळ्यांवर सोडतात. त्यामुळे जॅकरांडा असलेला परिसर गोडसर वासाने परिमळतो. झाडांच्या तळाशी झालेल्या फुलांच्या पखरणीमुळे काही काळ रम्य वाटले तरी नंतर फुले पुजल्यावर पायवाटा चिकट, घाण होऊन स्वच्छता राखणे त्रासदायक ठरते. बहर संपल्यावर लागणाऱया शेंगा गोलाकार, चपटय़ा पुरीसारख्या असतात. या पुऱया आधी हिरव्या, मग तपकिरी आणि नंतर लाकडासारख्या कठीण होतात. त्या दोन भागांत उकलल्यावर पातळ, हलक्या बिया बाहेर पडतात आणि कवचे तशीच झाडावर लटकलेली राहतात.
आपल्याकडे मात्र ‘जॅकरांडा’ या कवितेत कवी वसंत बापट म्हणतात तसा ‘…इथे तिथे जिथे तिथे उघड उघड जॅकरांडा’ महाराष्ट्रापेक्षा हिंदुस्थानच्या उत्तरेस जास्त आढळतो. तेथील रस्त्यांच्या दुतर्फा, आलटून पालटून लावलेल्या जॅकरांडा-बहाव्याच्या बहरलेल्या झाडांची कमान होऊन ती छत्रचामरे ढाळत असल्याचा भास होतो. झाडांच्या तळाशी निळी-जांभळी-पिवळी अशी ‘विरोधी म्हणूनच दिलखेचक असणारी रंगसंगती’ साधणारा पाकळ्यांचा गालिचा ते चित्र अजूनच देखणे करतो. नकळत ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा…’ या काव्यपंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. स्वप्नातल्या गावाकडे नेणारी वाट अशी स्वप्‘नील’ करणाऱया जॅकरांडाचे ‘हृदयस्थ’ असणे म्हणूनच आश्चर्यचकित करत नाही.
रंजक आख्यायिका
‘आंतरजाला’वर जॅकरांडाशी निगडित इतर देशांतील रंजक आख्यायिका वाचायला मिळतात आणि मानवाच्या वृक्षांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे वैश्विक सत्य जाणवते. एका कथेत अॅमेझॉनच्या परिसरात चंद्रलोकातील राजकन्या जॅकरांडाच्या झाडावर राहत असते, ती नंतर झाडावरून उतरून गावकऱयांबरोबर राहायला लागते. स्वतःकडील ज्ञान, नीतितत्त्वे देऊन चांगले-वाईट यातील फरकही त्यांना समजावून सांगितल्यावर ती जॅकरांडाच्या फुलांमध्ये परत जाते. तेव्हापासून जॅकरांडाला ‘ज्ञानाचे’ प्रतीक मानले जाते. युरोप-अमेरिकेतील का@लेजेस-युनिव्हर्सिटीजच्या प्रांगणांत जॅकरांडा हमखास असतोच. नेमका त्यांच्या परीक्षांच्या हंगामात हा पठ्ठय़ा वेडय़ासारखा बहरून येतो आणि ‘परीक्षा जवळ आल्या’, ‘असाईनमेंट्स कम्प्लीट करायला घ्या’ अशी विद्यार्थ्यांच्या मनात जणू धडकीच भरवतो! या भन्नाट ‘टायमिंग’मुळे त्याला ‘पर्पल पॅनिक’ आणि ‘एक्झॅम ट्री’ असेही म्हणतात! जॅकरांडाच्या झाडाखालून जाताना त्याचे फूल डोक्यावर पडले तर ‘विद्यार्थी नक्की पास होईल’ अशी पण समजूत आहे!



























































